बेळगाव : ले दारू… ले दारू… कार से भय्या ले दारू..!

बेळगाव : ले दारू… ले दारू… कार से भय्या ले दारू..!

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  सरकारी मद्य खासगी दुकानातून विकते… हॉटेल, बारमध्ये मद्य टेबलवर बसून खपते… हातभट्टीची दारू ट्युबमधून पळते… पण, बेळगावात एकाने चक्क गोवा बनावटीचे मद्य विकण्यासाठी कारमध्ये गोडावून बनवल्याचा प्रकार समोर आला आहे. महिन्यापूर्वी शास्त्रीनगरमध्ये मद्याने भरलेल्या कारचे गुपीत उलगडण्याच्या मार्गावर आहे.

शास्त्रीनगर येथे संशयास्पद कार थांबल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानंतर शहापूर पोलिसांनी या कारजवळ जाऊन चाचपणी केली तेव्हा यामध्ये मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. कार जेव्हा शहापूर पोलिस ठाण्यात नेऊन लावत उघडली, तेव्हा या कारमध्ये चक्क पाच-दहा नव्हे तर शेकडो मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. सायंकाळी सुरू झालेली मोजदाद त्या दिवशी रात्री केव्हा तरी संपली. दुसर्‍या दिवशी हे मद्य दीड लाखाचे असल्याचे स्पष्ट झाले.

या मद्याची रंजक कहाणी

शहापूर पोलिसांना याबाबत विचारले असता अद्याप तपास सुरू आहे, इतकेच सांगतात. परंतु, कारमध्ये सापडलेल्या या मद्याची कहाणी तितकीच रंजक आहे. बेळगाव परिसरात मद्य विक्रीत नव्याने एक 'सूरज ' उगवतो आहे. हा सूरज आधी समर्थनगर परिसरातून बेकायदेशीर मद्य विक्री करायचा. यासाठी तो दरवेळी गोवा बनावटीचे मद्य मागवत होता. त्याचा या बेकायदेशीर व्यवसायात इतका जम बसला की त्याने समर्थनगर परिसरातच स्वतःचे गोडावून तयार केले. येथून त्याचे मद्य व्यवस्थिपणे मागणी तसा पुरवठा होत होते. मार्केट पोलिसांना हाताशी धरूनच हे सर्वकाही चालले असल्याचा संशय होताच. परंतु, अचानक त्याच्या गोडावूनला आयुक्तालयातील गुन्हे विभागाची नजर लागली. त्यामुळे आता आपण पकडले जाऊ, या भितीने त्याने हे गोडावूनच बंद केले.

बेकायदेशीर मद्याला मागणी तर वाढली होती अन् गोडावून तर बंद झाले. मग स्टॉक ठेवायचा कुठे?असा प्रश्न त्याला पडला. मग त्याने नवीन आयडिया सुरू केली. प्रत्येक भागात एखादी बंद पडलेली कार शोधायची, ती व्यवस्थित लॉक करता येते का? याची शहानिशा करायची, तशी नसेल तर तेथे आपल्याकडची एखादी पोलिसांना शोधता येऊ नये, अशा पद्धतीची कार तयार करून ती तेथे लावली जात होती. त्यामध्ये मद्य भरून ठेवले जात होते. ज्याला जसे हवे तसे रात्रीच्यावेळी ते काढून दिले जात होते. शास्त्रीनगर येथे लावलेली कार देखील अशाच पद्धतीने लावल्याचा सुगावा पोलिसांना लागला आहे. परंतु, पोलिस अद्याप याला दुजोरा देत नाहीत.

संशयित ताब्यात पण…

शास्त्रीनगर येथे कार व त्यामध्ये तब्बल दिड लाखाचे मद्य सापडण्यापूर्वी याची माहिती पोलिस आयुक्तालयातील गुन्हे विभागाला मिळाली होती. ते कारवाईसाठी गेल्यानंतर शहापूर पोलिसांनी ती जबाबदारी आपल्यावर घेतली. शहापूर पोलिस गेले पंधरा दिवस याचा शोध घेत आहेत. काहींना आणून त्यांनी चौकशी केल्याचे माध्यमांना सांगत आहेत. परंतु, याच्या म्होरक्याला पकडल्याचे पोलिस सांगत नाहीत. बेकायदेशीर मद्य विक्रीतील उगवता 'सूरज ' ला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते. त्याच्याकडून बरीच माहितीही शहापूर पोलिसांनी घेतलेली आहे. परंतु, त्याच्यावर कारवाई होऊ नये, यासाठी अनेकजण सरसावले असल्याने अद्याप गुन्हा दाखल होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. कारण, ज्या कारमध्ये मद्य सापडले आहे, ती कार चोरीची आहे. त्याचा क्रमांक बदलून दुसराच क्रमांक लावल्याने ती नेमकी कार कोणाची व त्याच्या चोरीची कुठे तक्रार झाली आहे का? याचाही पोलिसांना तपास घ्यावा लागणार आहे. त्यामुळे यातील मद्य आपले नव्हेच, अशी भूमिका जर त्या मद्य मालकानेच घेतली तर पोलिसांना कारवाईतही अडचणी येणार आहेत.

फिरती मद्यविक्री केंद्रे होऊ नयेत

बार, पब, लॉजिंग बोर्डिंग या ठिकाणी तसेच अनेक ढाब्यांमध्ये मद्य मिळते, इथपर्यंत ठिक आहे. परंतु, आता जर मद्याचे गोडावून म्हणून कारमध्ये साठवले जाऊ लागले तर हा प्रकार गंभीर आहे. फिरती घंटागडी, स्वच्छतागृहे, कचरावाहू वाहने इथपर्यंत ठिक आहे. परंतु, कारमध्ये मद्य गोडावून तयार होऊ लागली, तर भविष्यात फिरती मद्यविक्री केंद्रे तयार व्हायला कितीसा उशीर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news