निपाणी; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या धर्मादाय खात्याच्या व्याप्तीत येणाऱ्या मंदिरांमध्ये प्रथा असलेल्या 'दिवटी सलाम', 'सलाम आरती' आणि 'सलाम मंगल 'आरती' या धार्मिक पूजाविधींची नावे बदलून हिंदू परंपरेप्रमाणे नाव देण्याबाबत व्यापक चर्चा झाली. या पूजांची नावे बदलून स्थानिक भाषेतील शब्द वापरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती धर्मादाय खात्याच्या मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिली. टिपू सुलतान यांच्या काळापासून आरती व मंगल आरतीना सलाम हा शब्द वापरला जात होता. दक्षिण कन्नड जिल्ह्यातील कुक्के सुब्रह्मण्य, कोल्लर, पुत्तूर महालिंगेश्वर मंदिरांमध्ये ही प्रथा होती.
मंत्री जोल्ले म्हणाल्या, धर्मादाय खात्याच्या व्याप्तीतील धर्मादाय खात्याच्या ज्येष्ठ पंडितांच्या म्हणण्यानुसार मंदिरामध्ये यापुढे दिवटी सलामऐवजी दिवटीला नमस्कार, सलाम आरतीऐवजी आरती नमस्कार आणि सलाम मंगल आरतीऐवजी मंगलारती नमस्कार म्हणून नाव बदलून सेवाकार्य सुरू ठेवण्याबाबत परिपत्रक जारी करण्यात येणार आहे. सलाम हा शब्द काढून टाकला आहे. आरती पूजा रद्द होणार नाही. केवळ दुसऱ्या भाषेतील शब्द बदलून आपल्या काही मंदिरामध्ये सकाळ, दुपार आणि सायंकाळच्यावेळी दिवा हातात घरून देवतेची आरती करणे याला दिवटी सलाम, सलाम मंगल आरती आणि सलाम आरती म्हटले जात होते. या नावांमध्ये बदल व्हावा, अशी भाविक व पुजारी वर्गातून मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर भाविकांकडून पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा आणि पूजा चालू ठेवण्यात येणार आहेत. कोणताही पूजाविधी रद्द केला जाणार नाही.