बेळगाव; अंजर अथणीकर : कर्नाटक मंत्रिमंडळाचा बहुप्रतिक्षित विस्तार आता धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय! अशा कात्रीत सापडला आहे. मंत्रिमंडळात सध्या सात पदे रिक्त आहेत. यापैकी किती पदे भरणार आणि ती पदे कोणाला देणार? याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही. एकास मंत्रिपद दिले तर चौघांची नाराजी ओढवून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई मात्र विस्ताराच्या चर्चेसाठी दिल्लीला जात आहे म्हणून सांगून वेळ मारुन नेत आहेत.
पुढील वर्षी मे पूर्वी विधानसभा निवडणूक होणार आहे. यासाठी आता फार तर चार महिन्यांचा कालावधी सरकारकडे राहिला आहे. बेळगाव जिल्ह्यातील दोन पदांसह राज्यात एकूण सात मंत्रिपदे रिक्त आहेत. उर्वरित कार्यकाळात आता विधिमंडळाची दोन अधिवेशने होणार आहेत. यापैकी बेळगावचे अधिवेशन 19 डिसेंबरपासून होत आहे. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होणार आहे. मार्चमधील अधिवेशन आचारसंहितेच्या कात्रीत अडकण्याची शक्यता आहे.
पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पक्ष एकसंघ ठेवण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर आहे. मंत्रिपदाकडे अनेकजण डोळे लावून बसले आहेत. इच्छुकांची संख्या अधिक असून एकाला मंत्रिपद दिले तर चौघे नाराज होणार हे निश्चित आहे. याचा परिणाम निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाची मनधरणी करण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात दोन मंत्रिपदे रिक्त आहेत. अश्लील सीडीमुळे रमेश जारकीहोळींना राजीनामा द्यावा लागला होता. उमेश कत्तींच्या निधनामुळे मंत्रिपद रिक्त आहे. या दोन पदांसाठी आता रमेश जारकीहोळी, लक्ष्मण सवदी, श्रीमंत पाटील, अभय पाटील आदींची तयारी सुरु आहे. माजी ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री के. एच. ईश्वराप्पा यांना क्लिनचीट मिळाल्याने तेही मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत. दुसर्या बाजूला नव्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नव्या चेहर्यांना संधी मिळावी, अशीही मागणी होत आहे. जनसंकल्प यात्रा झाल्यानंतर आपण हायकमांडला भेटण्यासाठी दिल्लीला जात आहे, असे सांगून महिना लोटला तरी ते अजून गेले नाहीत. उरलेल्या चार महिन्यांसाठी मंत्रिमंडळ विस्तार करणार की अशीच वेळ मारुन नेणार, असा प्रश्न इच्छुकांतून विचारला जात आहे.
मंत्रिमंडळ विस्तारासह इतर कारणावरुन नाराज असलेल्या सदस्यांबरोबर निजदचे प्रतिनिधी सातत्याने संपर्कात आहेत. यासाठी गेल्या महिनाभरात चारवेळा निजद प्रदेशाध्यक्ष सी. एम. इब्राहिम बेळगाव जिल्हा दौर्यावर आले आहेत. पक्षात प्रवेश करणार्यांचा त्यांनी 10 डिसेंबर रोजी मेळावा आयोजित केला आहे.
मंत्रिपद फार तर चार ते पाच महिन्यांसाठी मिळणार असले तरी यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. काही गंभीर आरोप असणारे आमदार मंत्रिपद मिळाले तर क्लिनचिट मिळेल असा अर्थ लावत आहेत. मे मध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत असून, नियमानुसार त्याच्या किमान दीड महिना आधी आचारसंहिता लागू होणार आहे.