बेळगाव : ‘बनावट गोल्ड गँग’ गजाआड .. सोसायट्यांमध्ये बनावट सोने तारण

बेळगाव : ‘बनावट गोल्ड गँग’ गजाआड ..  सोसायट्यांमध्ये बनावट सोने तारण
Published on
Updated on

बेळगाव;  पुढारी वृत्तसेवा :  बँका व सहकारी सोसायट्यांमध्ये बनावट सोने तारण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज उचलणार्‍या 'बनावट गोल्ड गँग'च्या मुसक्या चिकोडी व सदलगा पोलिसांनी आवळल्या आहेत. एकसंबा येथील बिरेश्वर को-ऑप. सोसायटीने तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एकूण नऊ सोसायट्यांना या टोळीने लाखोंचा गंडा घातल्याचा संशय आहे. सर्वांना अटक करण्यात आली आहे.

मुख्य संशयित अमूल गणपती पोतदार (रा. कोल्हापूर), पप्पू मदनलाल जांगीड (रा. जयपूर, राजस्थान) हे असून, या दोघांसह त्यांना साथ देणार्‍यांत ओंकार चंद्रकांत दबाडे, गणेश नेमिनाथ घोडके, चंदू गजाज चोरगे, गौसपाक अब्दुल रज्जाक जमादार (चौघेही रा. इचलकरंजी), सुहास साताप्पा मोहिते (कोल्हापूर) व फरीद अब्दुल मकानदार (रा. अथणी) यांचा समावेश आहे. त्यांची कोणत्या सोसायटीतून किती रक्कम उचलली, याबाबत चौकशी केली जात आहे. या आठही जणांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबईहून बनावट सोने खरेदी

मुख्य संशयित अमूल पोतदार याचा कोल्हापूर येथे सराफी व्यवसाय आहे. त्यानेच ही युक्ती सर्वांना दिल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अमूल मुंबईहून बनावट सोने 10 ते 15 हजार रुपये तोळा दराने आणत होता. तो व दुसरा मुख्य संशयित पप्पू जांगीड हे दोघे मिळून या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्कचा बनावट शिक्का मुंबई येथूनच मारून घेत होते. हे सोने बँक तसेच सोसायट्यांमध्ये तारण ठेवल्यानंतर त्यावर बँक, सोसायट्यांच्या नियमानुसार कर्ज लाटत असत.

फसवणुकीचा प्रकार असा…

उर्वरित सहआरोपी दोघांना कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करत असत. हे सर्वजण बँकांमध्ये खातेदारांना शोधत. खातेधारकाला थोड्याशा कमिशनचे आमिष दाखवून, 'तुला इतके सोने देतो, यावर आम्हाला इतके कर्ज मिळवून दे,' असे सांगत. खातेदारालाही सोने बनावट आहे, हे समजत नव्हते. त्यामुळे अनेक खातेदारांनी 'बनावट गोल्ड गँग'ला असे कर्ज मिळवून दिले आहे.

'बिरेश्वर'ला समजले

संशयितांनी एकसंबा येथील बिरेश्वर को-ऑप. सोसायटीत असे बनावट सोने ठेवून 2 लाख 75 हजारांचे कर्ज उचलले होते. सोसायटीने जेव्हा या सोन्याची सत्यता पुन्हा पडताळून पाहिली तेव्हा ते बनावट असल्याचे आढळले. हे कर्ज दादासाहेब दत्तू टिळक (रा. भोज, ता. चिकोडी) याच्या नावे असल्याचे समजते. सोसायटीचे व्यवस्थापक आनंद कमते यांनी खातेदाराबाबतची माहिती सदलगा पोलिस ठाण्याला दिली. पोलिसांच्या चौकशीत, कर्ज घेणार्‍याने या पैशांचा वापर केलेला नसून, ही रक्कम भलत्याच लोकांनी उचलली आहे, हे समोर आले. तपास खोलवर सुरू झाला आणि ही 'बनावट गोल्ड गँग' उजेडात आली.

महिनाभरापासून तपास

चिकोडीचे उपअधीक्षक बसवराज यलिगार यांनी पाळेमुळे खणून काढण्याची सूचना चिकोडी व सदलगा पोलिसांना केली. या प्रकरणाचा तपास गेल्या महिनाभरापासून सुरू होता. चिकोडीचे निरीक्षक आर. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदलग्याचे उपनिरीक्षक भरत एस., चिकोडीचे उपनिरीक्षक यमनाप्पा मांग, गुन्हे विभागाचे उपनिरीक्षक प्रवीण बिळगी, के. एस. इळीगार, एस. एम. बडोदे, एम. एम. फडतरे, एम. पी. सत्तीगेरी, आर. एल. शीळनवर, एस. पी. गलगली हे तपासात सहभागी होते. या आगळ्या प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी चिकोडीचे उपअधीक्षक, चिकोडी, सदलगा पोलिस ठाण्यांचे पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

    यांची फसवणूक

  • कर्नाटक को-ऑप. सोसायटी, रायबाग
  •  एचडीएफसी बँक, चिकोडी
  • एम.ए.जी. फायनान्स, चिकोडी आयसीआयसीआय बँक, चिकोडी अ‍ॅक्सिस बँक, बैलहोंगल अ‍ॅक्सिस बँक, निपाणी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news