बेळगाव : प्रशासकीय राजवटीतच नामांतराचा घाट का?

बेळगाव : प्रशासकीय राजवटीतच नामांतराचा घाट का?

बेळगाव; जितेंद्र शिंदे :  आरपीडी सर्कलच्या नामांतराचा घाट महापालिकेने घातला आहे. पण, गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेवर प्रशासक आहे. अशात नामांतराचा प्रस्ताव कुणी दिला आणि लोकनियुक्त सभागृह नसताना नामांतर करून लोकभावना दुखावण्याचे काम महापालिका का करत आहे, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आरपीडी सर्कलचे नामांतर करून प्रशासन स्वत:हून भाषिक वाद कोणाच्या सांगण्यावरून वाढवत आहे, हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.

मार्च 2019 ला लोकनियुक्त सभागृह बरखास्त झाले. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. महापालिका निवडणूक होऊन वर्ष होत आले तरी महापौर, उपमहापौर निवडणूक होत नसल्यामुळे साडेतीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटच सुरू आहे. अशा काळात लोकांच्या भावना भडकावणारे प्रस्ताव महापालिकेने का ठेवावेत, असा सवाल उपस्थित होत आहे. लोकनियुक्त सभागृह अस्तित्वात आल्यानंतर त्यावर विचार करता येत नाही का, असाही प्रश्‍न निर्माण होत असून महापालिकेच्या या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

काही वर्षांपूर्वी शहरातील चौक, रस्त्यांना कन्‍नड नेते, साहित्यीक, राजकारण्यांची नावे देण्याच्या सूचना कर्नाटकाच्या सीमा संरक्षण प्राधिकरणाने केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने जुने बेळगाव ते अलारवाड क्रॉसपर्यंतच्या रस्त्याला बी. एस. येडियुराप्पा यांचे नाव दिले. याआधी बुडाकडून विकसित करण्यात आलेल्या वसाहतीला एच. डी. कुमारस्वामी यांचे नाव दिले आहे. असे असले तरी आरपीडी कॉर्नर हे नाव अनेक वर्षांपासून प्रचलित असताना त्याच्या नामांतराचा घाट घालण्यात आला आहे. केवळ मराठी ओळख पुसण्यासाठी हा प्रकार होत असल्याचा आरोप होत आहे.

आरपीडीचा इतिहास
आरपीडी म्हणजे राणी पार्वती देवी. राणी पार्वती देवी या सावंतवाडी भोसले घराण्याच्या राजमाता. त्या बडोदा येथील राजा फत्तेसिंह राजे गायकवाड यांच्या कन्या. त्या खूप दानशूर होत्या. हिंडलगा येथील राजवाडा आणि बेळगावात त्या उन्हाळ्यात राहायला येत असत. 1945 साली त्यांनी सावंतवाडीत महाविद्यालय सुरू केले. पण, मलेरियाच्या महामारीमुळे हे आरपीडी महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय झाला. पण, तत्कालीन मुंबई प्रांताचे अर्थमंत्री अण्णासाहेब लठ्ठे, बाबुराव ठाकूर, डॉ. जी. व्ही. हेरेकर, कर्नाटक सिंह गंगाधरराव देशपांडे, व्ही. व्ही. हेरवाडकर, डॉ. वाय. के. प्रभू यांच्या विनंतीवरून 1947-48 ला राणी पार्वती देवी यांनी बेळगावला महाविद्यालय स्थलांतरित केले.
या महाविद्यालयात ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर, पद्मभूषण पु. ल. देशपांडे, भारतीय संस्कृती संशोधक कल्‍लाप्पा कुंदानगर यांच्यासह विविध नामवंतांनी विद्यादानाचे काम केले आहे. गोवा मुक्ती संग्रामात आरपीडी महाविद्यालयाने मोठे योगदान दिले आहे. गोवा राष्ट्रीय काँग्रेस आणि आझाद गोमंतक दलात आरपीडीचे विद्यार्थी होते. आंदोलकांचे हे प्रमुख केंद्र होते. याचा उल्‍लेख गोवा सरकारनेही केला आहे.

पर्याय काय?
आरपीडी सर्कल हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. पोलिसांपासून सर्वच सरकार दरबारी त्याचा उल्‍लेख आहे. असे असतानाही नामांतराचा विषय येणे दुर्दैवी आहे. त्यामुळे महापालिकेने मदकरी नायक यांचे नाव अन्य ठिकाणी द्यावे. स्मार्ट सिटी योजनेतून अनेक कामे सुरू आहेत. केपीटीसीएल रोड सारख्या नावाला अर्थ नाही, त्याठिकाणी मदकरी नायक यांचे नाव द्यावे. एखादे उद्यान विकसित करून नाव द्यावे. पण, प्रशासकांनी दोन भाषिक आणि धर्मियांना नामांतरावरुन वाद निर्माण करू नये, अशी अपेक्षा बेळगावच्या जनतेची आहे.

मदकरी नायक कोण होते?
मदकरी नायक हे चित्रदुर्गचे राजे होते. नायक समाजातील सर्वात श्रेष्ठ नायक समजले जातात. 1754 ते 1779 अशी त्यांची कारकीर्द होती. टिपू सुलतानने त्यांना पकडले आणि श्रीरंगपट्टणच्या कारागृहात त्यांचा मृत्यू झाला. उपलब्ध माहितीनुसार त्यांचे बेळगावसाठी योगदान दिसून येत नाही.

काय, काय घडले?
महापालिकेने प्रशासकीय काळात आरपीडी सर्कलच्या नामांतराचा प्रस्ताव ठेवला आणि त्यासाठी लोकांचे आक्षेप मागितले आहेत. दोन्ही बाजूंनी मते मांडण्यात येत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एका प्राध्यापकाने आरपीडी सर्कलच्या नामांतरात विरोध केल्यामुळे काही कन्‍नडिगांनी शिक्षण संस्था आणि त्याच्यावर दबाव घालण्यात आला. नोकरीतून काढून टाकण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे त्याने माफी मागितली. आरपीडी सर्कलच्या नामांतराविरोधात साऊथ कोंकण एज्युकेशन संस्थेने आक्षेप घेतला आहे. जिल्हाधिकारी आणि महापालिकेकडे तो नोंदवला आहे.

तीन आक्षेप दाखल
आरपीडी सर्कलच्या नामांतराविरोधात महापालिकेकडे तीन आक्षेप दाखल झाले आहेत. हा प्रस्ताव महापालिकेनेच लोकांसमोर ठेवला आहे. त्यावरील आक्षेपांची दखल घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news