

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर महिना उजाडला तरी पावसाचा मुक्काम कायम आहे. सोमवारी सकाळी शहर परिसराला मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे सर्वत्र पाणीचपाणी झाले होते. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे भात पिकाला फटका बसला असून काही भागात पीक आडवे झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
सकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर संततधार तर कधी मुसळधार पाऊस कोसळला. दुपारी एकपर्यंत पाऊस सुरूच होता. दुपारी दीडनंतर पावसाने विश्रांती घेतली. मुसळधार पावसामुळे गटारी तुंबल्या होत्या. तसेच रस्त्यांवरून पाणी वाहत होते. सखल भागात पाणी साचून राहिले. पावसामुळे बाजारपेठेवरही परिणाम दिसून आला. खडेबाजार, गणपत गल्ली, काकती वेस, टिळकवाडी, गोवावेसमधील रस्ते निर्मनुष्य झाले.
गांधीनगरमधील महामार्ग बायपास रोडवर गुडघाभर पाणी साचून राहिले होते. समर्थनगरातही पाणी तुंबले होते. यामुळे पादचार्यांसह वाहनचालकांचे हाल झाले. महापालिकेसमोरील आवारातही पाणी साचून राहिले होते. तीन दिवसांच्या खंडानंतर सोमवारी पाऊस झाला. रविवारी गणेशपूर आणि हिंडलगा परिसरात जोरदार पाऊस झाला होता.