बेळगाव : नगरसेवकाची अधिकार्‍यांकडून वसुली

बेळगाव : नगरसेवकाची अधिकार्‍यांकडून वसुली

बेळगाव, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेत सर्वकाही आपलेच चालते, असा अविर्भाव आणत एका ज्येष्ठ नगरसेवकाने महापालिकेतील अधिकार्‍यांकडून वसुली सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वी त्याने महसूल विभागातील अधिकार्‍यांना नगरसेवकांची तसेच आमदारांची भीती दाखवत सुमारे अडीच लाख रुपये उकळल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेतील या आंधळ्या कारभारावर कुणाचेच लक्ष नाही का, असा प्रश्न असताना 'त्या' नगरसेवकाला एका पदाधिकार्‍याच्या 'दिव्यपुत्रा'ची साथ मिळाली आहे.

महापालिकेवर भाजपच्या नगरसेवकांची सत्ता आहे. मात्र, आता काँग्रेसचे सरकार आल्याने पालिकेत काँग्रेसचेही वर्चस्व वाढले आहे. तरीही अद्याप वरकमाई फारशी मिळत नसल्याने एक ज्येष्ठ नगरसेवक काही महिन्यांपासून अस्वस्थ आहे. त्यामुळे त्याने आता इतर नगरसेवक माझेच ऐकतात.

त्यांच्याकडून त्रास नको असेल तर मला पैसे द्या' असे सांगायला सुरवात केली आहे. पालिकेतील दोन-चार अधिकार्‍यांना बोलवायचे, सर्वांसमक्ष त्यांचा पाणउतारा करायचा आणि आपण किती पॉवरफूल आहोत, हे भासवण्याचा प्रयत्न करायचा, असाही प्रकार या ज्येष्ठ नगरसेवकाकडून सध्या सुरू आहे.

अडीच लाखांची वसुली

सदर ज्येष्ठ नगरसेवक आणि तो पदाधिकारीपुत्र चार दिवसांपूर्वी महापालिकेच्या महसूल विभागात गेले होते. तुम्हाला कोणत्याही नगरसेवकाचा त्रास होणार नाही, कोणी तुम्हाला काहीही बोलणार नाही, माझ्यासह अन्य नगरसेवकही तुमच्याबद्दल काहीही तक्रार करणार नाहीत, याची पूर्णपणे हमी मी घेतो, असे सांगत त्याने अधिकार्‍यांना विश्वास दिला. त्यााबदल्यात त्याने महसूल विभागातून चक्क अडीच लाखांची रक्कम जमवली. तसेच हा प्रकार कोणा नगरसेवकांना अथवा इतरांना बोलू नका, असे देखील त्याने सांगितल्याचे समजते. एकंदरित आमदार अन् इतरांची भिती घालून ब्लॅकमेल करण्याचा प्रकार त्याच्याकडून सुरू असल्याचेच बोलले जात आहे.

दोन्ही डगरीवर पाय

मी आमदार अभय पाटील यांच्या फार जवळचा आहे, असे हा नगरसेवक आतापर्यंत सांगत होता. परंतु, काँग्रेसची सत्ता येताच आता आपण मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याही जवळचा आहे, हेदेखील भासवण्याचा प्रयत्न करत आहे. दोन्ही डगरींवर पाय ठेवत आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न या ज्येष्ठाकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news