

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कॅण्टोन्मेंट परिसरात गरजा वाढत चालल्याने विकासासाठी निधी कमी पडत चालला आहे. त्यामुळे कॅण्टोन्मेंट हद्दीत तीन ठिकाणी व्यापारी गाळे उभारण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या आराखड्याला गुरुवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारकडून मिळणारा निधीदेखील तुटपुंजा पडत असल्याने कॅण्न्टोन्मेंट बोर्डने व्यापारी संकुलाचा विकास करून त्यातून उत्पन्न मिळवण्याचा प्रस्ताव तयार केला होता. गुरुवारी झालेल्या मासिक बैठकीत या विषयावर चर्चा करण्यातआली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडिअर जॉयदीप मुखर्जी होते. यावेळी कॅण्टोन्मेंट बोर्ड सीईओ के. आनंद, व्यवस्थापक एम. वाय. तालुकर, सदस्य सुधीर तुपेकर, अभियंता सतीश मण्णूरकर उपस्थित होते.
केंद्र सरकारकडून कॅण्टोन्मेंट बोर्डला शासनाकडून मिळणार्या अनुदानात कपात करण्यात आल्याने पाणीपट्टी व वीजबिल थकले आहे. त्यामुळे महसूल वाढविण्यासाठी विविध ठिकाणी असलेल्या व्यापारी संकुलांच्या इमारतींचे बांधकाम करून भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव कॅण्टोन्मेंटने तयार केला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकाशेजारी असलेल्या जागेत बहुमजली पार्किंगतळ उभारण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती सीईओ के. आनंद यांनी दिली. बैठकीत किल्ला भाजी मार्केट, रेल्वे स्थानक, कॅण्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाशेजारील व्यापारी संकुलाचा विकास करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
किल्ला येथील भाजी मार्केटचे गाळे वापराविना
किल्ला येथील भाजी मार्केट पहिल्यांदा एपीएमसीमध्ये हलवण्यात आले. त्यामुळे कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या महसुलात कमालीची घट झाली आहे. कॅण्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील किल्ला येथील व्यापारी गाळे वापराविना आहेत. या ठिकाणी रात्रीच्या वेळी गैरकारभारांना ऊत आला आहे. मात्र, या बाबत बैठकीत चर्चा झाली नाही. गेल्या मासिक बैठकीत आ. अनिल बेनके यांनी याबाबत आवाज उठवला होता.