

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या जीवघेण्या साथीनंतर सुटकेचा निश्वास सोडलेल्या भाविकांनी यावर्षी मोठ्या थाटात गणेशोत्सवाचे स्वागत केले. दोन वर्षे गायब झालेला उत्साह यावर्षी पाहावयास मिळाला. ढोल, ताशांच्या गजरात भाविकांच्या अपूर्व अशा उत्साहात घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन बुधवारी झाले. यामध्ये भाविक रंगून गेले होते. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती आणण्यात येत होत्या.
ग्रामीण भागात गणेशोत्सव सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो. घरोघरी गणेशमूर्तीचे मनोभावे पूजन करण्यात येते. मागील दोन वर्षे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे उत्साहावर विरजण पडले होते. परंतु यंदा कोरोनाचे संकट टळल्याने आणि प्रशासनाने निर्बंध हटवल्याने गणेशोत्सवाचे स्वागत धुमधडाक्यात करण्यात आले. यावर्षी भाविकांमध्ये प्रचंड प्रमाणात उत्साह दिसून आला. यामुळे बुधवारी पहाटेपासूनच भाविकांची लगबग पाहावयास मिळाली.
ग्रामीण भागातील प्रत्येक गावात घरोघरी गणेशमूर्तीचे पूजन केले जाते. अकरा दिवस मोठ्या श्रद्धेने पूजा, आरती, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामुळे भाविकांच्या उत्साहाला उधाण येते. याचे प्रत्यंतर बुधवारी पाहावयास मिळाले. सामान्यांच्या जीवनावर अद्याप कोरोनाचे सावट कायम असले तरी कोरोनामुळे निर्माण झालेली मरगळ झटकून भाविकांनी थाटात गणेशाचे स्वागत केले.
घरगुती गणेशमूर्तीच्या आगमनासाठी ढोल, ताशे, बँड यांचा वापर करण्यात आला. वाहनांच्या साहाय्याने मूर्ती आणण्यात येत होत्या. त्याचबरोबर टेम्पो, टॅ्रक्स, टॅ्रक्टर यांचाही मोठया प्रमाणात वापर करण्यात आला. यामुळे दिवसभर वर्दळ वाढली होती.
यावर्षी उत्साहात भाविकांचा उत्साह पाहावयास मिळाला तरी उत्सवावर महागाईचे सावट असल्याचे दिसून आले. मूर्तीचे दर निम्म्याहून अधिक पटीने वाढवण्यात आले. यामुळे भाविकांना आर्थिक फटका बसला. बाजारात सजावटीच्या साहित्याचेही दर वाढवण्यात आले होते. भाविकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
सकाळपासून घरगुती गणपतींचा आगमन सोहळा रंगला होता. दुपारपर्यंत मूर्ती नेण्यात आल्या. तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मूर्ती रात्री उशिरापर्यंत आणण्यात आल्या. सायंकाळी चार वाजल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती आणण्यास प्रारंभ झाला. रात्री दहापर्यंत आरतीचे कार्यक्रम मंडपातून सुरू होते. कार्यकर्त्यांकडून धावपळ करण्यात येत होती.