बेळगाव : कॉलेज बसला अपघात; 2 ठार

बेळगाव : कॉलेज बसला अपघात; 2 ठार
Published on
Updated on

संबरगी; पुढारी वृत्तसेवा :  सांगली-विजापूर राज्य महामार्गावर अथणी शहराजवळ विद्यार्थिनींना घेऊन जाणारी कॉलेज बस आणि खासगी आयशर टेम्पो यांच्यात टक्कर होऊन दोन ठार झाले, तर 39 विद्यार्थिनी जखमी झाल्या. बसमध्ये एकूण 74 विद्यार्थिनी होत्या. बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे त्या विद्यार्थिनींचा जीव वाचला.
बसचालक रघुनाथ अवताडे (रा. कोडगनूर, ता. अथणी) आणि टेम्पो चालक मलिकसाहेब मुजावर (वय 23, रा. कलमडी, जिल्हा विजापूर) अशी मृतांची नावे आहेत.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ; बनजवाड पीयू कॉलेजमधील 74 विद्यार्थिनींना वसतिगृहातून कॉलेजकडे नेण्यात येत होते. तर टेंपो सांगलीहून अथणीकडे पाईप घेऊन येत होता. सकाळी पावणेआठच्या सुमारास टेंपोने बसला समोरून धडक दिली. टेंपोचे नियंत्रण सुटून टेंपो आपल्या दिशेने येत असल्याचे कळताच बसचालक रघुनाथने बस रस्त्याकडेला वळवली. तरीही टेंपोने चालकाच्या बाजूला धडक दिली. त्यात रघुनाथचा जागीच मृत्यू झाला. शिवाय टेंपोचालकही ठार झाला. अपघात दोन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या, तर 37 विद्यार्थिनींना किरकोळ दुखापत झाली आहे. किरकोळ जखमींना अथणीतील विविध खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींची संख्या जास्त असल्याने अथणीतील सार्‍याच डॉक्टरांनी नेहमीच्या रुग्णांना नंंतर बोलावून आधी जखमींवर उपचार केले.
बसचालक रघुनाथ माजी सैनिक होता. तो कॉलेज बसवर चालक म्हणून काम करीत होता. टेंपो बसच्या दिशेने येत असल्याचे दिसताच त्याने बस रस्त्याकडेला वळवली त्यामुळे आमने-सामने धडक टळली आणि मोठ्या अपघातापासून बचावलो, अशी माहिती विद्यार्थिनींनी दिली.

सकाळी आठपासून ते बारा वाजेपर्यंत रुग्णवाहिकेचा आवाज घुमत होता. अपघात पाण्यासाठी शहरातील विद्यार्थ्यांचे पालक व शहरवासीयाचा लोंढा अपघातस्थळाकडे जात होता. त्यामुळे काही काळ एसटी वाहतूक बंद केली होती.
घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी भेट देऊन जखमीची विचारपूस केली. ते दोन चालकाचा मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी गंभीर आहेत.त्यांची प्रकृती सुधारत आहे शहरातील खासगी आणि सरकारी दवाखान्यांत जखमींना दाखल केले आहे. अथणी शहरातील लोकांनी वेळीच धाव घेऊन तातडीने जखमींना उपचारासाठी पाठवल्याने जीव वाचवे. त्यांचे मी अभिनंदन करतो.
प्रांताधिकारी संतोष कामगौडा, तहसीलदार सुरेश मुंजे यांनीही भेट देऊन जखमींची विचारपूस केली. युवा नेता चिदानंद सवदी, गजानन मंगसुळी, माजी आमदार शहाजान डोंगरगाव यांनी जखमींची विचारपूस केली.

आरटीओ एस. बी. तीर्थ यांच्याशी संपर्क साधला असता परिवहन खात्याच्या नियमानुसार प्रवास करणे अत्यावश्यक आहे. बसमध्ये क्षमतेपेक्षा अधिक संख्या असल्याने नोटीस देण्यात येणार आहे त्याचबरोबर शहरात विनानंबर वाहने दिसल्यास लवकरच कारवाई करण्यात येणार आहे. तसेच शाळांच्या वाहनांनी क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी भरू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा त्यांनी इशारा दिला

दोन विद्यार्थिनी, शिक्षिका गंभीर
पंधरा वर्षांपूर्वी पार्थनहळ्ळी गावाजवळ विहिरीत बस पडून पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या बसला अपघात होण्याची ही दुसरी घटना आहे. अपघातात दोन विद्यार्थिनी आणि एक शिक्षिका गंभीर आहे. विद्यार्थिनींना मिरजला, तर शिक्षिकेला बेळगावला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news