

संबरगी; पुढारी वृत्तसेवा : अथणी तालुक्यातील कृष्णा काठ परिसरात महापूर स्थिती असताना दुसरीकडे अग्रणी नदीचे पात्र मात्र कोरडे पडले आहे. एकाच तालुक्यात परस्परविरोधी स्थिती असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. एकीकडे पाण्यामुळे पिकांना धोका तर दुसरीकडे पाण्याशिवाय पिके कशी जगणार, याची चिंता आहे. दोन्ही भागातील गावांना समस्येचा सामना करावा लागत आहे.
अथणी तालुक्यात दुष्काळ आणि महापूर पाचवीला पूजलेला आहे. सरकारने यावर अद्याप ठोस तोडगा काढलेला नाही. शासनाकडून प्रत्येक वर्षी आश्वासन दिले जाते. पण, महापूर आला की दरवर्षी गाव सोडून स्थलांतर होण्याची वेळ येते. महापूर आला की एक महिना सरकारची मदत मिळत असते. नुकसानग्रस्त घरांची भरपाई दिली जाते. त्यांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. पुनर्वसन केंद्रात जाण्यासही कोण तयार नसते. तालुक्यात अनेक ठिकाणी पुनर्वसन केंद्र उभी केली आहेत. तेथे वास्तव्याला जाण्यास नागरिक तयार नसल्याने पुनर्वसन केंद्र असून अडचण झाली आहेत.
तालुक्यातील 26 गावांना पुराचा धोका आहे. त्यामध्ये 22 गावांना पहिल्यांदा धोका पोहोचतो. गावाजवळ पाणी आले की पहिली दहा गावे स्थलांतरित होतात. पाणीपातळी वाढत असताना अन्य गावांना धोका निर्माण होतो. महापूर आला की पूरग्रस्तांना जिल्हा व राज्य संघ-संस्थांकडून अत्यावश्यक वस्तू मोफत दिल्या जातात. गेल्या अठरा वर्षांपासून हेच चित्र दिसत आहे.
अथणी उत्तर भागात 60 किलोमीटर अंतरावर अग्रणी नदी आहे. दरवर्षी पश्चिमेकडे महापूर असताना ही नदी कोरडीच असते. सहा महिने नदी कधी प्रवाहित झाली नाही. कारण परिसरात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. ऐन पावसाळ्यात शेतकर्यांवर पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. आमदार श्रीमंत पाटील या भागात पाणी योजना आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हा भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नियोजन असले तरी त्याला अजून मूर्त रूप आलेले नाही. सरकार दरबारी पाठपुरावा सुरू असला तरी ही योजना पूर्ण झाल्यानंतरच हा भाग सुजलाम् सुफलाम् होणार आहे.
..तर शेतकर्यांना अनुकूल
कर्नाटक व महाराष्ट्र राज्यात एकच पक्षाचे सरकार आहे. कर्नाटकच्या सीमेवरून एक किलोमीटर अंतरावरून ताकारी म्हैसाळ पाणी जत कवठेमंकाळला जाते. दोन्ही राज्याच्या सरकारने चर्चा करून उत्तर भागात पाणी सोडल्यास शेतकर्यांना अनुकूल होणार आहे. या विषयावर चर्चा करून तोडगा काढावा, अशी मागणी दुष्काळग्रस्त भागातून होत आहे.