

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : शहर परिसरात गेल्या चार दिवसांपासून दुपारपर्यंत उन्हाचे चटके, दुपारनंतर पाऊस, त्यानंतर सायंकाळी थंडी असे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी कमाल तपमान 29 पर्यंत पोहचले होते. यामुळे ऐन पावसाळ्यात बेळगावकरांना उन्हाळ्याचे चटके सोसावे लागले.
गेल्या चार दिवसांपासून शहराचे तापमान कमाल 28 ते 29 तर किमान तपमान 20 ते 22 डिग्री सेल्सिअस होत आहे. दुपारनंतर जोरदार पावसाची हजेरी लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात 40 ते 55 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
रविवारी मात्र पावसाने पूर्णपणे उघडीप दिली. कमाल तापमान 28 ते 29 अंश सेल्सियसपर्यंत पोहचले होते. यामुळे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी छत्र्यांचा आधार घ्यावा लागला. पावसाच्या उघडीमुळे खडेबाजारमध्येही ग्राहकांनी गर्दी केली होती. किरकोळ व्यापार्यांनी ग्राहकासाठी दुकानापुढे छत घातले होते.
बेळगाव, खानापूर वगळता पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे. भातरोप लागवड जवळपास पूर्ण झाले आहे. यामुळे आता शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
अथणी, कागवाड, चिकोडी, रामदुर्ग, हुक्केरी, सौंदत्ती या तालुक्याकडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. मध्यंतरी चार ते पाच दिवस चांगला पाऊस झाला. यामुळे पुराचीही भीती निर्माण झाली होती. त्यानंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे.
जिल्ह्यातील धरणेही अद्याप 60 टक्केही भरलेली नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील धरणासह अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. यंदा जून महिना कोरडा गेला. त्यानंतर 1 जुलैपासून पंधरा दिवस चांगला पाऊस झाला. यानंतर पावसाचा जोर ओसरला आहे.
गेल्या 24 तासांत सकाळी 8 पर्यंतचा पाऊस
बेळगाव :……..12 मिमी
खानापूर :……..40 मिमी
सौंदत्ती :………6.8 मिमी
अथणी :……….8 मिमी
कागवाड :……..4 मिमी
रामदुर्ग :……….5 मिमी
हुक्केरी :……19.2 मिमी
बैलहोंगल :…….4 मिमी
निपाणी :…..14.4 मिमी
चिकोडी:…..20.7 मिमी
गोकाक :…..17.3 मिमी
रायबाग :…..42.4 मिमी