

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : कर्जातून सवलतीच्या रूपात मिळणारी रक्कम बँक खात्यावर जमा करण्यासाठी लाच घेणार्या दोन अधिकार्यांना लोकायुक्त पोलिसांनी बुधवारी रंगेहाथ अटक केली.
उद्यमबाग येथील जिल्हा औद्योगिक केंद्राचे (डीआयसी) सहसंचालक शिवपुत्रप्पा हरिजन व सहायक संचालक जी. पद्मकांत अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ते त्यांच्या कार्यालयात 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले. फिर्यादी गिरीश कुलकर्णी (रा. राजारामनगर, उद्यमबाग) यांच्या धाकट्या भावाची एच. के. टेक्नॉलॉजीस कंपनी आहे. या कंपनीचे नवीन युनिट सुरू करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारच्या औद्योगिक विभागाकडे कर्ज रकमेची मागणी केली होती. हे कर्ज मंजूर करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या शिफारसीची गरज आहे. कर्ज मिळाल्यानंतर त्याला 30 टक्के अनुदान मिळते. ही सवलत मिळवून देण्यासाठी उपरोक्त दोघे संशयित फिर्याददाराकडे 50 हजाराची लाच मागत होते.
19 ऑक्टोबर रोजी कुलकर्णी यांनी बेळगाव लोकायुक्तांकडे तक्रार केली. तातडीने दखल घेत याच दिवशी लोकायुक्त पोलिस आयुक्त श्रीमती यशोदा वंटगोडी यांच्या नेतृत्वाखाली उद्यमबागमधील डीआयसीवर छापा टाकण्यात आला. आधी रचलेल्या सापळ्यानुसार सहसंचालक व सहायक संचालकाला लाच घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. लोकायुक्त पोलिस उपअधीक्षक जे. रघू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवीकुमार धर्मट्टी व त्यांच्या सहकार्यांनी हा छापा टाकला.