बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : पिकांचे नुकसानीचा सर्व्हे करताना शेतकर्यांचे हित लक्षात घ्यावे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात चारशे कोटींचे नुकसान झाले असून, एनडीआरएफ मार्गदर्शक तत्वानुसार शासनाला 105 कोटी रुपयांचा नुकसानीचा अहवाल सादर करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी दिली.
येथील विश्रामगृहाच्या सभागृहामध्ये पालकमंत्री कारजोळ यांनी शनिवारी अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीबाबत आणि उपाययोजनांबाबत जिल्हास्तरीय अधिकार्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलिस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या आदी उपस्थित होते.
कारजोळ म्हणाले, पिकांच्या नुकसानीचे सर्व्हे करताना शेतकर्यांचे हित लक्षात घेऊन कार्यवाही करावी. संयुक्त पाहणीनंतरही काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून त्याचा समावेश त्यामध्ये करण्यात यावा. जिल्ह्यात नुकताच झालेल्या अतिवृष्टीमुळे एकूण 400 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून सध्या एनडीआरएफ मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 105 कोटी रुपयांच्या नुकसानीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक दिवस जमिनीत पाणी साचून राहते, फळबागा व भाजीपाला पिके पूर्णपणे नष्ट होतात. त्यामुळे सर्वेक्षण करताना या बाबींचा विचार करण्याच्या सूचना त्यांनी कृषी व फलोत्पादन विभागाच्या अधिकार्यांना दिल्या. घरांच्या नुकसानीचे सर्वेक्षण अतिशय जलदगतीने व पारदर्शकपणे करून नुकसानभरपाई जमा करण्यात आली आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचार्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. पिकांचे नुकसान व घराच्या नुकसानीचे सर्वेक्षण करताना कोणत्याही कारणास्तव बोगस प्रकरणांचा समावेश होणार नाही, याची काळजी घ्यावी. सर्वेक्षण करताना ते जास्तीत जास्त शेतकरी व कुटुंबीयांच्या उपस्थितीत करावे, असा सल्ला त्यांनी अधिकार्यांना दिला. सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करून तातडीने नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी, उपविभागीय अधिकारी रवींद्र करलिंगन्नवर, शशिधर बागली, कृषी विभागाचे सहसंचालक शिवानागौडा पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.