

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : अग्निवीर अंतर्गत वायुसेनेत दाखल होण्यासाठी ७ लाख ५० हजार युवकांनी अर्ज केले होते. त्यापैकी २ हजार ८५० युवकांची वायुसेनेत निवड झाली आहे. त्यांना सांबरा येथील वायुसेना प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण देण्यात येत असून हे प्रशिक्षण सहा महिने चालणार आहे. या युवकांनी चार वर्षे सेवा बजावल्यानंतर देशात इतर क्षेत्रात काम करण्यासाठी सक्षम मुनष्यबळ मिळेल. तसेच ज्यांना पुन्हा वायुसेनेत सेवा बजावायची आहे ते. पुन्हा अग्निवीर अंतर्गत अर्ज करु शकतात, अशी माहिती वायुसेना प्रशिक्षण मुख्य अधिकारी मानवेंद्र सिंह यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली.
सांबरा येथे अग्निवीर अंतर्गत प्रशिक्षण सुरु असलेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ते बोलत होते. देशातील जवानांना बेळगावातच प्रशिक्षण घेण्याचा निर्णय का घेतला, असे पत्रकारांनी विचारले असता सांबरा वायुसेना प्रशिक्षण केंद्र हे सर्वात जुने आहे. या ठिकाणी प्रशिक्षण घेतलेले जवान देशात कोणत्याही ठिकाणी सेवा बजावू शकतात. यानंतर देशात इतर ठिकाणी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वायुसेनेत चार वर्षे सेवा बजावलेल्या जवानांना पुन्हा वायुसेनेत संधी दिली जाईल.
मात्र पुन्हा अग्निवीर अंतर्गत अर्ज करुन प्रवेश मिळवला पाहिजे. सध्या डिजीटल युग आहे. त्यामुळे प्रत्येक जवानांना टॅब देण्यात येणार असून त्यातच संपूर्ण अभ्यासक्रमाचा सामावेश असेल. परीक्षासुद्धा संगणकाच्या माध्यमातून देता येणार आहे. त्यामुळे जवानांना नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करायला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जवानांना सर्व प्रथम संगणकाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर रायफल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यानंतर ते शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्यासाठी लांब उडी, धावणे, दोरीवर सरसर चढणे, दहा फुटाच्या भिंतीवरुन चढून उड्या मारणे, तोल सांभाळत चार इंच खांबावरुन चालणे, डोळे बांधून बंदूक चालवणे आदी प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
वायुसेनेत अग्निवीर अंतर्गत महिलांचीही भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता अर्ज मागवण्यात आले आहे. त्यातून निवड झालेल्या युवतींची पहिली तुकडी जूनमध्ये प्रशिक्षणासाठी येथे दाखल होणार आहे.