बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : परिवहन महामंडळाच्या बस तिकिटांवर जय महाराष्ट्रप्रकरणी गदग जिल्हा परिवहन नियंत्रकांसह सहा जणांच्या खातेनिहाय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. याबाबत महामंडळाने प्रसिद्धीसाठी पत्रक दिले आहे.
यापैकी तिघेजण गदग आणि तिघेजण रोण बस डेपोमध्ये सेवा बजावत आहेत. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तिकिटांचा वापर कर्नाटकातील गदग विभागातील बसमध्ये करण्यात आला होता. त्या तिकिटांवर कन्नडमध्ये सर्व तपशील होता. पण, मूळ कागदावर जय महाराष्ट्र असे मुद्रित करण्यात आले होते. गदग विभागाच्या बसेससाठी महाराष्ट्रातील बसेसच्या कागदाचा रोल पुरवण्यात आला होता. अधिकार्यांनी तो रोल तपासला नव्हता. असे 70 रोल रोण विभागातील बसेसना देण्यात आले होते. वाहकांनी तसेच ते वापरले. याबाबतचे वृत्त व्हायरल झाल्यानंतर तत्काळ त्या रोलचा वापर बंद करण्यात आला.