पहिली निवडणूक सीमावासीयांच्या मुलूखमैदान तोफेविना; एन. डी. पाटील यांची उणीव जाणवणार

पहिली निवडणूक सीमावासीयांच्या मुलूखमैदान तोफेविना; एन. डी. पाटील यांची उणीव जाणवणार
Published on
Updated on

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि प्रा. डॉ. एन. डी. पाटील हे अतूट समीकरण होते. सीमालढ्याची ठिणगी पडल्यापासून ते अखेरच्या श्वासापर्यंत लढा देणारा हा लढवय्या नेता सीमावासीयांचा खर्‍या अर्थाने आधारवड होता. आता त्यांच्या अनुपस्थितीत ही पहिलीच निवडणूक.

सीमावासीयांच्या प्रत्येक लढ्यात अग्रभागी राहून अन्यायाविरोधात आवाज उठवणे, मराठी माणसांना एकसंध ठेवणे आणि प्रसंगी महाराष्ट्राला जाब विचारण्याची ताकद भाई एन. डी. पाटील यांच्यात होती. त्यामुळेच ते सीमावासीयांत विशेष लोकप्रिय होते. किंबहुना एन. डी. पाटील म्हणजेच सीमालढा असे चित्र होते. त्यांच्या सोबतीने लढ्यातील चारही पिढ्या मोठ्या निकराने लढा देत आल्या आहेत. त्यांचा शब्द अखेरचा मानून सीमाप्रश्न आणि म. ए. समितीसाठी अनेकांनी त्याग केला आहे. सीमाप्रश्नी भाई एन. डी. पाटील यांच्याइतका सक्रियपणा अन्य कोणत्याही नेत्याने दाखवलेला नाही. वृद्धापकाळामुळे ते अंथरूणाला खिळले तरी त्यांचे लक्ष सीमालढ्याकडे होते. महाराष्ट्र एकीकरण समितीचे सात आमदार ते शून्य आमदार अशी अनेक स्थित्यंतरे त्यांनी पाहिली. पण, मराठी माणसांच्या हितासाठी त्यांनी कधीही माघार घेतली नाही. म. ए. समितीत उभी फूट पडली तरी न्यायाच्या बाजूने ते नेहमीच उभे राहिले.

सीमाभागातील मराठी माणसांच्या बर्‍यावाईट सर्वच घटनांचे साक्षीदार भाई एन. डी. पाटील होते. त्यामुळे मराठी जनतेला त्यांचा मोठा आधार होता. महाराष्ट्रातील नेत्यांसमोर मराठी माणसांची व्यथा मांडताना ते कधीही कचरले नाहीत. शिवाय सीमाभागातील संघटना मजबूत ठेवण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. 1956 साली पहिल्या लढ्यात सहभागी झालेल्या भाई एन. डी. पाटील यांनी सीमाभागातील सर्वच आंदोलनांत सक्रीय सहभाग नोंदवला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवता ते सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे थांबले.
सीमाभागात आजतागायत झालेल्या सर्वच निवडणुकांत त्यांनी मराठी भाषिकांचा गड लढवला. गत निवडणुकीवेळीही त्यांनी गावोगावी प्रचाराची धुरा सांभाळली होती. कोणतेही आजारपण त्यांना अडवू शकत नव्हते.

हुतात्मा दिनीच अखेरचा श्वास

17 जानेवारी हा सीमावासीयांचा हुतात्मा दिन. 17 जानेवारी 1956 रोजी झालेल्या गोळीबारात सात जणांनी सर्वोच्च बलिदान देत हौतात्म्य पत्करले होते. वृद्धापकाळामुळे काहीशा कमजोर झालेल्या भाई प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनीही 17 जानेवारी 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. हा अनोखा योगायोग होता. भाई एन. डी. पाटील सीमावासीयांच्या मनात जागा मिळवली आहे. आता त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news