निपाणी : हालसिद्धनाथ यात्रा 11 ऑक्टो.पासून

निपाणी : हालसिद्धनाथ यात्रा 11 ऑक्टो.पासून

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र कुर्ली-आप्पाचीवाडी येथील हालसिध्दनाथ देवाची (भोंब) पौर्णिमेला साजरी होणारी पाचदिवसीय यात्रा 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यात्रेनिमित्त दि. 11 ते 15 पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.11 रोजी सकाळी श्रींची पालखी, सबिना सोहळा, रात्री ढोल जागर, 12 रोजी रात्री ढोलजागर, श्रींची पालखी प्रदक्षिणा, 13 रोजी रात्री श्रींची पालखी सबिना प्रदक्षिणा, उत्तर रात्री नाथांची पहिली भाकणूक होणार असून 14 रोजी यात्रेचा मुख्य दिवस आहे.या दिवशी दिवसभर महानैवेद्य रात्री श्रींची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर उत्तर रात्री मुख्य दुसरी भाकणूक होणार आहे. दि. 15 रोजी सकाळी 7 वाजता घुमटातील मंदिरात भाकणूक झाल्यानंतर सायंकाळी 4 वाजता श्रींची पालखी प्रदक्षिणा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

विशेष म्हणजे दरवर्षी भरणार्‍या या नाथांच्या भोंब पौर्णिमेच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी असते. नाथांचे भक्त भगवान डोणे व त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ डोणे (वाघापूरकर) यांंची भाकणूक होते. या यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील लाखो भाविक हजेरी लावतात.
यात्रेनिमित्त पूर्वतयारी सुरू असल्याची माहिती आप्पाचीवाडी ग्रा. प. सदस्य व यात्रा कमिटी अध्यक्ष बाबुराव खोत व ग्राम पंचायतीतर्फे देण्यात आली. यात्राकाळात पाच दिवस शाळा आवारात हालसिध्दनाथ सेवा संस्थेतर्फे भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. भाविकांनी यात्रेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यात्रेसाठी जादा बसेस

यात्रेत येणार्‍या विविध दुकानांसाठी जागा देण्याचे काम दि. 6 रोजी सकाळी 10 ते 5 यावेळेत होणार आहे. यात्राकाळात सौंदलगा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे मोफत आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. भाविकांसाठी कोल्हापूर, कागल, निपाणी, चिकोडी रायबाग, गारगोटी व संकेश्वर येथून जादा बसेसची सोय केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news