निपाणी नगरपालिकेत गदारोळ, अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार

निपाणी : नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभेत उडालेला गोंधळ.
निपाणी : नगरपालिकेच्या सभागृहात मंगळवारी सर्वसाधारण सभेत उडालेला गोंधळ.
Published on
Updated on

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : निपाणी नगरपालिकेत गोंधळ, गदारोळ, हमरीतुमरी, धक्काबुक्की, अंगावर धाऊन जाण्याचा प्रकार, ये बघतो, असे आव्हान प्रति-आव्हान अशा गोंधळी वातावरणात सर्वसाधारण सभा मंगळवारी गाजली. सत्तारूढ गटाने विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन करून चर्चा न करताच सर्व 25 विषय बहुमताने हात वर करून मंजूर केले. म्युनिसिपल हायस्कूलच्या हस्तांतरणाचा निर्णय तज्ज्ञांची समिती स्थापन करून घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण नगराध्यक्ष जयवंत भाटले यांनी दिले.

निपाणी नगरपालिकेत सर्वसाधारण सभा मंगळवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या विश्वासराव शिंदे सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष जयवंत भाटले होते. बैठकीला सुरुवात होताच विषयपत्रिकेचे वाचन करण्याआधीच माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पाणी प्रश्नावर बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, नगराध्यक्ष भाटले यांनी त्यांना बोलू न देता विषय पत्रिकांचे वाचन करावयास लावले.

निपाणी नगरपालिकेत मागील सभेच्या इतिवृत्तास मंजुरी देण्यावरून आधी वादंग झाले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील 10 विषय मंजूर करण्यात आले. अकराव्या क्रमांकाचा विषय म्युनिसिपल हायस्कूलचे सरकारला हस्तांतरण करण्याबाबतचा होता. त्यावेळी देखील 'मंजूर मंजूर'चा नारा सत्तारूढ गटाने लावला.

यावेळी विरोधी गटाचे नेते विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, संजय सांगावकर, शेरू बडेघर, संजय पावले, दत्ता नाईक, डॉ जसराज गिरे, शौकत मनेर यांनी नगराध्यक्षा समोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. त्यामुळे मोठा गोंधळ गदारोळ झाला. सत्तारुढ गटाच्या विनायक वडे, दत्ता जोत्रे, दीपक पाटील यांनी देखील धाव घेतली.

सभापती सद्दाम नगारजी यांनी टेबलावरून खाली उडी मारली. अनेक नगरसेवक टेबलवर उभारून आरडाओरड करीत होते. सुमारे वीस मिनिटे हा गोंधळ गदारोळ सुरू होता.

गदारोळात महिला नगरसेवकांचा आवाज मोठा होता. उपनगराध्यक्षा नीता बागडे यांनी विरोधी नगरसेवकांना जागेवर बसून बोलण्याच्या सूचना केल्या. यावेळी सभागृहाला आखाड्याचे स्वरूप आले होते.

सभागृहाचा अपमान होतोय अशी ओरड राजू गुंडेशा, सद्दाम नगरजी यांनी केली. गाडीवड्डर यांनी नगराध्यक्षांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केल्याने त्यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी सत्तारूढ गटाच्या नगरसेवकांनी मागणी केली. त्यामुळे आणखी गोंधळ गदारोळ उडाला. यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.

आशा ढवळे व सोनल कोटिया यांनी नगराध्यक्षांच्या अंगावर धावून गेलेल्या गाडीवड्डर यांनी माफी मागावी, अशी भूमिका मांडली. नगराध्यक्ष भाटले यांनी म्युनिसिपल हायस्कूलची पटसंख्या कमी होत असल्याने या शाळेचे सरकारला हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला असला तरी तज्ञांची समिती नेमून सल्ला घेऊ तसेच नागरिकांच्या विरोधात काम करणार नाही, असे स्पष्टीकरण दिले.

यावेळी गोंधळातच विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन करावयास लावून सत्तारूढ गटाने सर्व 25 विषय हात वर करून मंजूर केले व सभा संपल्याची घोषणा केली.

म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतरणासाठी कमिटी

सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नगराध्यक्ष जयवंत भाटले म्हणाले, म्युनिसिपल हायस्कूल हस्तांतरण प्रश्नाबाबत शहरातील शिक्षणतज्ज्ञांची कमिटी स्थापन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. सभेच्या सुरुवातीला गाडीवडर यांनी आपली परवानगी न घेताच बोलण्याचा प्रयत्न केला याबद्दल आपणास खेद वाटतो. हा सभागृहाचा अवमान आहे.

आम्ही गेल्या नऊ महिन्यांत दहा कोटी 41 लाखांची विकासकामे मंजूर केली आहेत. काळानुसार बदलले पाहिजे या उद्देशानेच हायस्कूलचे हस्तांतरण करण्याचा हेतू आहे.

विरोधकांनी महिला नगरसेविकांचा अपमान केल्याने त्याचा आपण निषेध करीत आहोत. सोनल कोठडिया म्हणाल्या, सभागृहात योग्यरीतीने चर्चा व्हायला हवी होती. मूळ मुद्दा बाजूला पडतो. ऐनवेळी विषयांतर होते. टीकाटिप्पणी केली जाते. स्त्रियांचा अवमान केला जातो. अपशब्द वापरले जातात, ही न शोभणारी कृती आहे. दत्ता जोत्रे यांनी विरोधकांना सत्ता गेल्याचे दुःख आहे. त्यामुळेच ते बेताल बोलत असल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news