कर्नाटक : पोलिस-शेतकर्‍यांत धुमश्‍चक्री

कर्नाटक : पोलिस-शेतकर्‍यांत धुमश्‍चक्री
Published on
Updated on

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश डावलून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुन्हा मंगळवारी हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम पोलिस बळावर सुरू केले. यामुळे पोलिस आणि शेतकर्‍यांमध्ये धुमश्‍चक्री उडाली. सकाळी 9 च्या सुमारास पोलिसांनी शेतकर्‍यांना ताब्यात घेतले. यानंतर उभ्या पिकातच जेसीबी चालवण्यात आला.

हलगा-मच्छे बायपास रोडवर सकाळी आठच्या सुमारास मारिहाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महांतेश बसापुरे यांच्या नेतृत्वाखाली जवळपास दोनशे पोलिसांचा बंदोबस्त घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी आणि बेळगाव विभागाचे प्रांताधिकारी रवी करिलिंगण्णावर पोहोचले. याची कुणकुण आधीच लागल्यामुळे शेतकरी कुटुंबीयांसमवेतच घटनास्थळी उपस्थित होते. पथकाने रस्ते कामाला सुरुवात करताच संतप्त शेतकर्‍यांनी या कामाला जोरदार विरोध सुरू केला.

हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम झिरो पॉईंट निश्‍चित झाल्याशिवाय हाती घेऊ नये, असे आदेश आहेत. तसेच चौथ्या दिवाणी न्यायालयाच्या स्थगिती आदेशाविरोधात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पहिल्या दिवाणी न्यायालयात दाखल केलेले अपिल फेटाळून लावताना न्यायालयाने बायपासची स्थगिती कायम ठेवली आहे. असे असताना स्थगिती आदेश डावलून तुम्ही काम कसे सुरू करता, असा जाब शेतकर्‍यांनी अधिकार्‍यांना विचारला. कामाची वर्कऑर्डर दाखवा मगच काम सुरु करा, अशी मागणी शेतकर्‍यांनी लावून धरली. यामुळे वादावादीला सुरुवात झाली.

ऊस, जोंधळा, कडधान्य आदी उभ्या पिकात जेसीबी घुसवून बायपास रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे शेतकर्‍यांनी घोषणाबाजी करत कामाला विरोध केला. आंदोलन करणारे बेळगाव तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू मरवे, प्रकाश नाईक, अनिल अनगोळकर, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, नितीन खन्नूकर, अमित अनगोळकर, महेश चतूर आदी सुमारे तीसहून अधिक शेतकर्‍यांना ताब्यात घेण्यात आले. शेतकरी महिलांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्याच्या कामाला जोरदार विरोध दर्शविला. ताब्यात घेतलेल्या आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना घटनास्थळावरून हटवून एपीएमसी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.

अन्याय खपवून घेणार नाही : मरवे

न्यायालयाचा आदेश डावलून बेकायदेशीररित्या पुन्हा बायपासचे काम हाती घेण्यात आले आहे. रस्त्यासाठी पुन्हा उभी पिके नष्ट करण्यात येत आहेत. हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. नेहमी मोठ्या प्रमाणात यंत्रसामग्री पाठवून बायपासचे काम हाती घेण्यात आहे. शेतकर्‍यावर दबाव टाकण्यात येत आहे, असे राजू मरवे म्हणाले.

पोलिसांचा चहाही नाकारला

शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह तीसहून अधिक आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांना पोलिसांनी सकाळी 9 वाजता ताब्यात घेतले. सायंकाळी 6 पर्यंत त्यांना एपीएमसी पोलिस ठाण्यात ठेवले होेते. यावेळी शेतकर्‍यांना पोलिसांनी जेवण देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकर्‍यांनी त्यांचा चहाही घेण्यास नकार दिला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news