कर्नाटक : जमीनफोड, नकाशे आता ऑनलाईन

कर्नाटक : जमीनफोड, नकाशे आता ऑनलाईन

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
जमीन मालकांना जमीनफोडी करण्यासाठी तसेच जमिनीची माहिती घेण्यासाठी यापुढे उपनोंदणी कार्यालयाच्या (सब रजिस्ट्रार ऑफिस) चकरा माराव्या लागणार नाहीत. कारण 11 ई-नकाशा, जमीन फोडी, भू-परिवर्तन करण्याचा पूर्व नकाशा आदी सर्व नकाशांसाठी अर्ज केल्यानंतर हे सर्व नकाशे ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी दिली आहे.

जमीन मालकांना आपल्या जमिनीचे सर्वेक्षण करून घेण्यासाठी आवश्यक असणारे नकाशे ऑनलाईन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. एखाद्या व्यक्‍तीला आपल्या जमिनीचा एखादा भाग विक्री करायचा असल्यास त्यासाठी 11-ई नकाशा स्वतः तयार करून घ्यावा लागतो.

जमिनीची फोड करणे, एखादा भाग बिगरशेती (एनए) करायचा असल्यास त्यासंबंधीचा नकाशा तयार करणे, यासाठी अर्ज करावा लागतो. त्यानंतर सरकारी जमीन सर्व्हेअर किंवा परवानाधारक जमीन सर्व्हेअर येऊन हा नकाशा तयार करून देत होते. मात्र ही किचकट प्रक्रिया आता सोईस्कर करण्यात आली आहे.

अर्ज करताना नकाशासाठी आवश्यक शुल्क भरल्यानंतर या ऑनलाईन संकेतस्थळावर नकाशा डाउनलोड करून घेतला जाऊ शकतो. त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. आपला नकाशा आणि नकाशा मंजूर होण्याची प्रक्रिया अर्जाची स्थिती आदी सर्व माहिती देखील यावर उपलब्ध होणार आहे. लोकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नीतेश पाटील यांनी केले आहे.

नकाशासाठी अर्ज केल्यानंतर http://rdservices.karnataka.gov.in या संकेतस्थळावर हे ऑनलाइन नकाशे उपलब्ध होणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news