

धारवाड : युवा काँग्रेसचे नेते आणि संघटनेचे महासचिव फैरोज पठाण यांची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हा खून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या 24 एप्रिलला त्यांचे लग्न होणार होते. हत्या करून फरार झालेल्या हल्लेखोरांना अटक करण्यासाठी आवळी नगर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.
हाश्मी नगरात पठाण यांचे घर आहे. शनिवारी सकाळी ते घरातील एका खोलीत बसले होते. दहा वाजण्याच्या सुमारास चार हल्लेखोरांनी दरवाजा तोडून त्यांच्यावर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करून त्यांची हत्या केली. घरात झालेल्या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पठाण कुटुंबीयांनी हा खून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला आहे. 24 तारखेला त्यांचे लग्नही होणार होते. ते तयारीत व्यस्त होते.
पोलिस आयुक्त एन. शशिकुमार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, सकाळी 9.30 ते 10 या वेळेत फिरोज घरी असताना चार जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. हे कृत्य कोणी व का केले, हा तपास सुरू आहे. काही धागेदोरे मिळाले असून लवकरच हल्लेखोरांच्या मुसक्या आवळू.