Uttarakhand Heavy Rainfall Issue |जिल्ह्यातील शेकडो पर्यटक अडकले
बेळगाव : श्रावण मासानिमित्त बेळगाव जिल्ह्यातील शेकडो पर्यटक चारधाम यात्रेसाठी गेले आहेत. मात्र, उत्तराखंड राज्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते खचले आहेत. उत्तर काशीमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, पूल वाहून गेले आहेत. चारधाम मार्गावरील अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेल्याने जिल्ह्यातून गेलेले अनेक पर्यटक दूरवर सखल भागातच दोन दिवसांपासून अडकून पडले आहेत.
बेळगाव जिल्ह्यातून दरवर्षी श्रावण मासानिमित्त शेकडो भाविक चारधाम यात्रेला जाऊन गंगोत्री, यमुना, बद्रीनाथ, केदारनाथ या चारधामचे दर्शन घेतात. मात्र, सद्यस्थितीत ऋषिकेशमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक थांबून आहेत. शेगाव, हरिद्वार ही धार्मिक पर्यटन करून चारधाम यात्रेच्या पुढील टप्पा म्हणून उत्तराखंडमध्ये ऋषिकेशमधील धार्मिक स्थळांना भेटी देऊन पुढे केदारनाथला प्रयाण करतात. मात्र, सध्या उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी सुरू असून ऋषिकेशमध्ये बेळगावजवळील धामणे, येळ्ळूरसह शिनोळी बुद्रुक परिसरातील शेकडो पर्यटक थांबून आहेत. सध्या सोनप्रयागपर्यंत प्रवास सुखरूप होत आहे. यानंतर केदारनाथला जाण्यासाठी 22 किलोमीटर अंतर पायी चालत जावे लागते. याच मार्गावर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. त्यामुळे, सोनप्रयागपासून पुढे जाणार्यांना पासेस घेण्याची व्यवस्था आहे. मात्र, पुढे धोका असल्याने ऋषिकेश येथेच शेकडो पर्यटक थांबून आहेत.
मंगळवारी उत्तराखंडमधील उत्तर काशी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणचे रस्ते पूल वाहून गेले आहेत. लष्कराचे दहा जवान ही बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे, पुन्हा धोका होऊ शकतो. त्यामुळे सध्या ऋषिकेश येथेच पर्यटक थांबून आहेत. अतिवृष्टी कमी झाल्यानंतर पुढील दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.
श्रावण मासानिमित्त आम्ही उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला आलो आहोत. मात्र, सोनप्रयाग येथेच थांबावे लागले. येथून 22 किमी अंतर केदारनाथसाठी चालत जावे लागते. मात्र, याच मार्गावर अतिवृष्टीमुळे महामार्ग खचला आहे. तसेच अद्याप पुढील प्रवासासाठी आम्हाला पासेस उपलब्ध होत नाहीत. पुढील संभाव्य धोका टाळण्यासाठी आम्ही सध्या ऋषिकेश येथे थांबून आहोत.

