

खानापूर, पुढारी वृत्तसेवा : पुष्पा चित्रपटात रक्तचंदन तस्करीसाठी वापरण्यात आलेली सेम टू सेम शक्कल लढवत बेकायदेशीर मद्य वाहतुकीचा प्रकार अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला.
मालवाहू ट्रकच्या हौद्यात वेल्डिंग मारून पत्र्याचे चोरकप्पे करून त्यातून सुरू असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याच्या अवैध वाहतुकीचा अबकारी विभागाने भांडाफोड केला. बेळगाव गोवा व्हाया चोर्ला मार्गावरील कणकुंबी चेक पोस्टवर गुरुवारी उशिरा ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत 27 लाख 52 हजार रुपये किमतीचे मद्य आणि ट्रक जप्त करण्यात आला आहे.
गोव्याहून बेळगावच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकमधून मोठ्या प्रमाणात मद्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती बेळगाव विभागाच्या अबकारी आयुक्तांना मिळाली. बेळगाव येथून विशेष पथक पाठवून ही मोहीम राबविण्यात आली. संशयित ट्रक अडवून तपासणी करण्यात आली. मात्र सुरुवातीला कुठेच दारूसाठा आढळला नाही. खात्रीलायक माहिती असल्याने कसून तपासणी केली असता हौद्यातील लोखंडी पत्र्याचे वेल्डिंग संशयास्पद वाटले.
अखेरीस जेसीबीच्या सहाय्याने पत्रा तोडण्यात आला. त्यामध्ये तब्बल साडे सत्तावीस लाखाचा मद्यसाठा आढळून आला. चालक व क्लीनरला अटक करण्यात आली आहे. गेल्या किती दिवसांपासून हा प्रकार सुरू होता याचाही अबकारी अधिकारी शोध घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेतल्याने हा प्रकार उघडकीस आला.