बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांना हेरून त्यांचे दागिने चोरणार्या त्रिकुटाला मार्केट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सात लाखांचे 100 ग्रॅम दागिने जप्त केले. अटक केलेल्यांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. रिजवाना सिराज पठाण (वय 40, रा. बॉक्साईट रोड, विद्यानगर बेळगाव), मलिकजान दस्तगीरसाब शेख (26, रा. गोकाक) व विनायक अरुण हिंडलगेकर (32, रा. चव्हाट गल्ली, बेळगाव) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सोनसाखळी, सोन्याच्या बांगड्या, मंगळसूत्र असे शंभर ग्रॅमचे दागिने जप्त केले आहेत.
हे त्रिकूट बेळगाव सीबीटीमधून बसमध्ये बसणार्या तसेच अन्य ठिकाणाहून बेळगावला येणार्या प्रवाशांना हेरून त्यांच्यावर पाळत ठेवत दागिने पळवत होते. या त्रिकुटाने 2022 मध्ये मीनाक्षी कुशप्पनवर (मूळ रा. हारूगिरी व सध्या रा. रामतीर्थ नगर) यांचे दागिने बस मध्ये पळवले होते. त्यावेळी मार्केट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. याचा तसेच अन्य चोर्यांचा तपास करताना उपरोक्त तिघेजण सापडले. पोलिस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केटचे निरीक्षक महांतेश धामन्नवर, उपनिरीक्षक एच. एल. केरूर व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली. या कारवाईत शिवाप्पा तेली, लक्ष्मण कडोलकर, आय. एस. पाटील शंकर कुगटोळी, सुरेश कांबळे, कार्तिक एम. जी., अनिता हंचीनाळ यांनी सहभाग घेतला.