

बेळगाव : भरवाध टिप्परने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बेळगाव-वेंगुर्ला रोडवर सुळगेजवळ बुधवारी (दि. 19) दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात झाला. खालिद दस्तगीर ताशिलदार (वय 59, रा. साईनगर, उचगाव) असे मृताचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, खालिद उचगावहून दुचाकीवरून बेळगावला येत होते. सुळगेजवळ मागून येणार्या भरधाव टिप्परने त्यांना धडक दिली. त्यामुळे ते टिप्परच्या मागील चाकाखालीच पडले. चाक अंगावरून गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयाकडे हलविण्यात येत होते. मात्र, त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच काकती पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. खालिद यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
बेळगाव-वेंगुर्ला रस्त्याचे सध्या काम सुरू असून, रस्ता उखडण्यात आला आहे. त्यामुळे खड्डे चुकवण्यासाठी वाहने वेडीवाकडी पळवली जातात. त्यातूनच दुचाकीस्वाराला टिप्परने धडक दिल्याचे समजते.