

बेळगाव : थंडीपासून बचावासाठी खोलीत कोळशाची शेकोटी पेटवली. ती तशीच सुरू ठेवून झोपी गेल्यानंतर हवाबंद खोलीमुळे गुदमरून तिघा मावस भावांचा मृत्यू झाला. आणखी एक तरुण अत्यवस्थ आहे. अमननगर येथे ही धक्कादायक घटना घडली असून मंगळवारी दुपारी उघडकीस आली.
मृतांमध्ये रेहान रसूल मत्ते (वय 23, रा. जुने बेळगाव), सर्फराज मुस्ताक हरपनहळ्ळी (18) व मोईद अब्दुल नालबंद (24, दोघेही रा. अमननगर) यांचा समावेश आहे. या घटनेतील चौथा तरुण शहानवाज मुस्ताक हरपनहळ्ळी (20, रा. अमननगर) हा अत्यवस्थ असून जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अमननगर दुसरा क्रॉस येथे नामकरण समारंभ असल्याने येथे सर्व नातेवाईक जमले होते. मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास येथील समारंभ आटोपून मावस भाऊ असलेले उपरोक्त चौघे तरुण झोपण्यासाठी अमननगर येथील घरी आले.
थंडीमुळे शेकोटी पेटवली
ज्या खोलीत ते झोपण्यासाठी गेले ती घरातील शेवटची खोली आहे. या ठिकाणीही थंडी वाजू लागल्याने त्यांनी जर्मनची बुट्टी घेऊन यामध्ये कोळसा घालून शेकोटी तयारी केली. बहुदा आधी हे सर्वजण या ठिकाणी बसून शेकले असावेत. यानंतर त्यांनी शेकोटी न विझवता तसेच झोपी गेले.
बारा तासांनंतर उघड
हे चौघे तरुण झोपण्यासाठी घराकडे आले असता त्यांची आई, मावशी व बहीण समारंभाच्या घरीच झोपले होते. तरुणापैकी एकाच्या बहिणीने दुपारी एकच्या सुमारास आपल्या भावाला फोन केला. सातत्याने फोन करूनही तो उचलत नाही म्हटल्यानंतर येथून जवळच असलेल्या घरी ती गेली. खोलीला आतून कडी लावून ते झोपले असल्याने दरवाजा उघडत नव्हता. यावेळी तरुणीने खिडकीत आत हात घालत दरवाजा उघडला. आत जाऊन पाहिले असता चौघेही निपचित पडले होते. तिने तातडीने ही माहिती आपल्या आईला व अन्य नातेवाईकांना कळवली. घरी जाऊन पाहिले असता तिघांचा मृत्यू झाल्याचे तर एकजण अत्यवस्थ असल्याचे आढळून आले.
श्वास कोंडल्याने मृत्यू
या घटनेची माहिती माळमारुती पोलिसांना कळवली. निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी सहकाऱ्यांसह भेट दिली. पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनीही घटनास्थळी भेट दिली. यानंतर ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले, थंडीपासून बचावासाठी या तरुणांनी कोळशाची शेकोटी पेटवली. पेटता कोळसा ठेवून ते तसेच झोपी गेले असावेत.या खोलीला एकही खिडकी नसल्याने, धूर अथवा हवा बाहेर जाण्यास जागा दिसून येत नाही. त्यामुळे धगधगणाऱ्या कोळशातून कॉर्बन मोनॉक्साईड निघाल्याने श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी अब्दुल्ला मोहम्मदगौस नालबंद यांनी फिर्याद दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच बेळगाव उत्तरचे आ. राजू सेट व काँग्रेसचे युवानेते अमान सेट यांनीही अमननगर येथे भेट देऊन मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. ही फार दुःखद घटना आहे. अत्यवस्थ युवकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तो तरुण लवकर बरा व्हावा, अशी प्रार्थना करतो, असे आ. सेट म्हणाले.