

बेळगाव : वृक्षमाता म्हणून ख्याती मिळवलेल्या सालुमरद तिमक्का यांच्या नावाने पर्यावरण प्रेमींना पुरस्कार देण्यात येईल तर ज्येष्ठ साहित्यिक एस. एल. भैरप्पा यांचे म्हैसूर येथे स्मारक उभारून त्यांच्या स्मृती जपण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी (दि. 8) विधानसभेत दिली. हलगा येथील सुवर्णसौध येथे सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहून कामकाज तहकूब करण्यात आले. सभागृह सुरू होताच, अध्यक्ष यू. टी. कादर यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, सालुमरद तिमक्का 114 वर्षांचे आयुष्य जगल्या. या काळात त्यांनी आपल्या पोटी मूल नसल्याचे दुःख न मानता झाडांनाच आपले मुले मानली. रोपटी लावून त्यांची जोपासना केली. तुमकूर जिल्ह्यात त्यांनी हजारो झाडे वाढविली आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. त्यांना सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. त्यांनी सरकारकडे वस्तुसंग्रहालयाची मागणी केली होती. ती आपण पूर्ण करणार असून पर्यावरण रक्षणासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे.
एस. एल. भैरप्पा हे श्रेष्ठ दर्जाचे साहित्यिक होते. त्यांच्यात आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी त्यांचे साहित्य अव्वल दर्जाचे होते. त्यांच्या साहित्यावर अनेक चित्रपट निघाले, पुरस्कार देण्यात आले. आता त्यांच्या स्मृती जपण्यासाठी म्हैसुरात त्यांचे स्मारक उभारले जाईल. यावेळी त्यांनी आमदार एच. वाय. मेटी हे आपले निष्ठावंत होते. त्यांनी अगदी मंडळ पंचायत सदस्य ते आमदार, मंत्री, खासदार अशी पदे भूषविली आहेत. त्यांच्या निधनामुळे आपले वैयक्तिक नुकसान झाले आहे, असे सांगितले. माजी आमदार आर. व्ही. देवराय, माजी आमदार शिवशरणगौडा पाटील आणि विनोदी अभिनेते एम. एस. उमेश यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी, सालुमरद तिमक्का यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांनी केलेले काम सर्वांना प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे, असे सांगितले. एस. एल. भैरप्पा यांच्यामुळे कन्नड साहित्यात वैभवशाली भर पडली आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक उभारून सरकारने गौरव करावा, असेही ते म्हणाले. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिवंगत आमदार एच. वाय. मेटी यांच्या स्मृती जागविल्या. मंत्री आर. बी. तिम्मापूर, कायदा मंत्री एच. के. पाटील, जी. टी. पाटील, सिध्दू सवदी, अप्पाजी नाडगौडा, एम. टी. कृष्णप्पा, एच. सी. बालकृष्ण, एच. के. सरेश, एम. पी. नरेंद्रस्वामी, श्रीनिवासय्या एम., सी. के. राममूर्ती, महेश टेंगीनकाई, रूपकला एम. आदींनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.
सालुमरद तिमक्का कोण होत्या?
सलुमरदा तिमक्का यांचा जन्म 1911 साली तुमकुर जिल्ह्यातील गुब्बा तालुक्यात झाला. मुले नसल्याचे दुःख विसरण्यासाठी त्यांनी रस्त्याच्या कडेला वडाची रोपेे लावण्यास सुरुवात केली. रोपांना पाणी देण्यासाठी त्या चार किमी अंतरावरून बादल्यांमध्ये पाणी आणत असत. कुडुर आणि हुलिकल दरम्यानच्या चार महामार्गांवर त्यांनी झाडे लावली आणि त्यांचे मुलांसारखे संगोपन केले. 4,000 हून अधिक झाडे लावली. त्यांनी पर्यावरण आणि जैवविविधतेत मोठे योगदान दिले आहे. निरक्षर असूनही त्यांनी पर्यावरण संवर्धनात मोठे काम केले होते. त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार, कर्नाटक कल्पवल्ली पुरस्कार, राज्योत्सव पुरस्कार, नाडोेज पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 114 व्या वर्षी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी त्यांचे निधन झाले.
तिमक्कांना अभ्यासक्रमात स्थान द्या
विधानसभेत निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी समाजावर कोणतेही संकट आले की महिला आपले योगदान देत असतात. आता संपूर्ण जगावर पर्यावरण धोक्यात येण्याचे संकट आहे. अशा काळात सालुमरद तिमक्का यांनी हजारो झाडांची जोपासना करून एक महिला काय करू शकते, याचे उदाहरण दिले आहे. विकासाच्या नावावर पर्यावरणाची हानी करण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने पर्यावरणात काम करणार्या लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी तिमक्का यांच्या नावाने पुरस्कार देण्याबरोबरच शाळा, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमांत त्यांच्या कार्याचा उल्लेख करावा, अशी मागणी केली. तर आपण केवळ बोलून पर्यावरण वाचणार नाही तर सर्वांनी वर्षाला किमान एक झाड जोपासूया, असेही आवाहन त्यांनी केले.