Belgaon News : डॉल्बीला फाटा; साध्या विवाहाचा थाट मोठा
खानापूर : वासुदेव चौगुले
कोणत्याही बडेजावाला थारा न देता मराठा समाजाच्या नव्या आचारसंहितेप्रमाणे डॉल्बी, वरात, हुंडा यासारख्या गैरप्रकारांना फाटा देत नंदगडमध्ये (ता. खानापूर) पार पडलेल्या विवाह सोहळ्याने तालुकावासीयांचे लक्ष वेधून घेतले.
चन्नेवाडीतील निवृत्त शिक्षक विठ्ठल पाटील यांचे चिरंजीव विनय व अल्लेहोळमधील (ता. खानापूर) प्रगतशील शेतकरी पांडुरंग पाटील यांची कन्या मयुरी यांचा विवाह रविवारी (दि. 8) अतिशय साध्या पद्धतीने दुपारी 12.38 च्या मुहूर्तावर नंदगडमधील दक्षिण विभाग सोसायटीच्या हॉलमध्ये पार पडला.
अलीकडच्या काळात मराठा समाजातील विवाह मुहूर्तावर लागत नाहीत, डॉल्बीचा अतिरेक करुन मुहूर्तापूर्वी व नंतर दारुच्या नशेत तरुण वर्ग धिंगाणा घालताना दिसून येतो. यामुळे अक्षतारोपणासाठी आलेल्या पाहुणे मंडळींना अनेक तास ताटकळत थांबावे लागते. त्याशिवाय हुंड्याची देवाणघेवाण, प्रीवेंडिंग शूटिंग व कर्ज काढून बडेजाव करत लग्न करण्याची प्रथा रुढ होत चाललेली आहे. याबाबत समाजातील सुज्ञ लोकांतून नाराजीचा सूर दिसून येत आहे.
गैरप्रकारांना फाटा देऊन विवाह सोहळ्यांना अधिक अर्थपूर्ण करण्यासाठी व पारंपरिक पद्धतीने लग्न सोहळे व्हावेत यासाठी सर्व स्तरावर आग्रह वाढूनही या सुधारणांची अंमलबजावणी होत नव्हती. यामुळे समाजाची तसेच वधू, वर पक्षाची बदनामी होत होती. याबाबत नुकताच मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगाव तसेच महाराष्ट्रातील मराठा समाजाने घालून दिलेल्या आचारसहितेतील बहुतांशी नियम पाळून रविवारचा विवाह नातेवाईक, मित्रमंडळी व समाजातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीत केवळ पंधरा दिवसांच्या अवधीत पार पडला.
सर्वांचे कौतुक
ना डॉल्बीचा दणदणाट, ना धांगडधिंगा, ना प्रीवेडिंग शूटिंग, बडेजाव खर्च या सर्व गोष्टींची आचारसंहिता पाळत हा विवाहसोहळा सामोपचाराने दोन्ही कुटुंबांनी अगदी आनंदात पार पडला. या दोन्ही कुटुंबांचे, तसेच पंच म्हणून उपस्थित असलेल्या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

