खानापूर : गेल्या दोन दिवसांत पाच जणांनी जीवन संपविल्याने तालुका हादरून गेला आहे. यामध्ये तीन तरुण, एक युवती आणि एका वृद्धाचा समावेश आहे. दिवाळीच्या उत्साही वातावरणात सलग घडलेल्या या घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे.
पाच पैकी दोन जणांनी कर्जबाजारीपणातून जीवन संपवल्याचे पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून स्पष्ट होते. कर्जाची रक्कम जीवन संपवण्याचे पाऊल उचलावे इतकीही मोठी नसते. गंगवाळी येथे ३६ वर्षीय आणि प्रभूनगर येथे ४२ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आलेल्या नैराश्यातून गळफास घेऊन जीवन संपविले. रक्तदाब आणि मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असलेल्या गुंडेनहट्टी येथील वृद्धाने विषारी पदार्थ सेवन करून जीवन यात्रा संपवली.
बेकवाड येथे बारावीतील विद्यार्थिनीने घरातच गळफास घेऊन जीवन संपवले. मोबाईलचा अतिवापर करू नकोस हे घरच्यांचे सांगणे तिला मृत्यूहून अधिक असह्य वाटले. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आश्चर्याची बाब म्हणजे मृत्यूपूर्वी अगदी पाच मिनिटे आधी देखील ती घरच्यांबरोबर नेहमीसारखीच वागली. स्वतः घरातील मंडळींना सायंकाळचा चहा करून दिला. चहा घेत घेत सगळ्यांबरोबर गप्पा टप्पाही केल्या. सगळे काही व्यवस्थित असल्याचे भासवून अचानक बेडरूममध्ये जाऊन गळफास घेतला. या प्रकारावरून बाहेरून एखादी व्यक्ती शांत दिसत असली तरी मानसिक दृष्ट्या ती अस्थिर असू शकते. तिच्या मनातील नेमक्या भावना ओळखणे कठीण असते हे ठळकपणे जाणवते.
या घटनेला काही तासांचा अवधी लोटलेला नसताना, आज नंदगड येथील शिक्षकाने शहराजवळ झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी आर्थिक ओढाताण आणि तणावातून त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पाच पैकी चार जणांनी गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. ऐन सणासुदीच्या वातावरणात पाच जणांनी अकाली जीवन संपविल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आर्थिक व बाह्य कारणांबरोबरच आत्महत्येला संबंधित व्यक्तीची मानसिक अवस्थाही तितकीच कारणीभूत असल्याचे दिसून येते. कर्जबाजारीपणा, आर्थिक विवंचना, फसवणूक, तणाव, नैराश्य, अपयश यासारख्या कारणांना खिन्नता, अबोला, एकलकोंडेपणा यांची जोड मिळाल्यास व्यक्ती नकारात्मकतेच्या गर्तेत सापडते. समस्येतून बाहेर पडण्याऐवजी आत गुरफटून जातो. मृत्यू हीच समस्येपासून मुक्ती वाटू लागते. अशा परिस्थितीत समुपदेशन आणि मुक्त संवादातून संबंधित व्यक्तीच्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देता येते.