बेळगाव : शहरासह उपनगरात जागोजागी बसविण्यात आलेले प्लास्टिक गतिरोधकांची अनेक ठिकाणी दुरवस्था झाली आहे. अर्धवट उखडलेल्या अवस्थेत गतिरोधक असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. काही ठिकाणी प्लास्टिक गतिरोधक पूर्णपणे उखडले आहेत. मात्र रस्त्यावर मारलेले खिळे तसेच असल्याने याचा फटका वाहनधारकांना बसत आहे.
प्रशासनाने अशा गरिरोधकांची पाहणी करून सदर समस्या मार्गी लावावी अशी मागणी वाहनधारकांडून केली जात आहे. बेळगाव शहरासह उपनगरात स्मार्ट सीटी योजने अंतर्गत लाखो रूपये खर्चुन स्मार्ट प्लास्टिक गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सदर गतिरोधक खराब झाले आहेत. गतिरोधकांच्या दुरवस्थेचे चित्र पहावयास मिळत आहे. खराब झालेल्या गतिरोधकांचा अंदाज येत नसल्याने शहरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. खिळे व शिल्लक राहिलेल्या गतिरोधकाला चुकविण्याच्या नादात दुचाकी वाहने घसरून पडत असल्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारामुळे वाहनधारक गंभीर जखमी होत आहेत.
गतिरोधकासाठी वापरण्यात आलेल्या खिळ्यांवरून वाहने गेल्याने वाहने पंक्चर होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे वहानधारकांना याचा अर्थिक फटका सोसावा लागत आहे. त्याचबरोबर अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे गतीरोधकाची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.