

Bengaluru rape case
बंगळूरु : कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री येथील एका खासगी महाविद्यालयातील दोन प्राध्यापक आणि त्यांच्या मित्राला विद्यार्थिनीला बंगळूरुला बोलावून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पीडितेने कर्नाटक राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पीडित मुलगी त्याच महाविद्यालयात शिकते, जिथे आरोपी नरेंद्र भौतिकशास्त्र (physics) आणि दुसरा आरोपी संदीप जीवशास्त्र (biology) शिकवतो. अटक करण्यात आलेल्या तिसऱ्या व्यक्तीचे नाव अनुप असे असून, तो या दोघांचा मित्र आहे. ही घटना एक महिन्यापूर्वी घडली होती. याप्रकरणी मराठाहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोगाच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नरेंद्रने शैक्षणिक नोट्स देण्याच्या बहाण्याने विद्यार्थिनीला बेंगळुरूला बोलावले आणि एका मित्राच्या घरी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर संदीपने नरेंद्रसोबत असलेला व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले आणि पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार केला. तिसरा संशयित आरोपी अनुपने त्याच्याकडे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगत धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सुमारे एक महिन्यांपूर्वी घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलीने ही बाब आपल्या पालकांना सांगितल्यानंतर प्रकरण उघडकीस आले आणि तक्रार दाखल करण्यात आली. कर्नाटक महिला आयोगाच्या निर्देशांनुसार मराठहळ्ळी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. बेंगळुरू शहर पोलिसांच्या पूर्व विभागाचे सहआयुक्त रमेश बानोथ यांनी सांगितले की, "ही केस ५ जुलै रोजी नोंदवण्यात आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिला आयोगाकडून माहिती मिळाल्यानंतर पीडितेचा जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्यात आली असून तपास सुरू आहे."