

बेळगाव : अत्यंत प्रतिष्ठेची आणि जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकची निवडणूक 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या बँकेच्या निवडणुकीसाठी 2 हजार 693 मतदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आजी- माजी संचालक या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ही निवडणूक होण्यासाठी दीड महिना असला तरी मतदारांना आतापासूनच विविध ठिकाणी पाठवून दिले जात आहे. एक प्रकारे मतदारांची पळवापळवी सुरू झाली असून या मतदारांच्या खर्चासाठी तब्बल कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे मोठी रंगत निर्माण झाली आहे.
खानापूर, हुक्करी, चिकोडी तसेच इतर तालुक्यातील मतदारांना आतापासून सहलीला पाठवले जात आहे. दररोज त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. काही मतदारांना शिर्डी, अक्कलकोट तसेच महाराष्ट्रातील विविध धार्मिक क्षेत्रासह पर्यटन स्थळांनाही पाठवून देण्यात आले आहे.जिल्हा बँकेच्या या निवडणुकीसाठी काही पतसंस्थांना मोठ्या रकमेची ऑफर यापूर्वी देण्यात आली होती. मात्र आता काहीजण रिंगणातून बाहेर पडल्यामुळे तो आकडा कमी झाला आहे. काहीजणांनी मतदारांना विविध ठिकाणी असलेल्या फार्म हाऊस तसेच विविध कारखान्यांच्या कार्यालयात ठेवल्याची चर्चा सुरू आहे. त्यांना त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या बँकेच्या निवडणुकीत पतसंस्था व सोसायटींच्या एका व्यक्तीला मतदानाचा अधिकार असतो. ज्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे, त्या व्यक्तीचा संबंधित सोसायटीमध्ये ठराव केला जातो. मात्र अद्याप काही सोसायटीच्या बैठका झाल्या नाहीत. अशा सोसायटीच्या सर्वच संचालकांना बोलावून घेऊन त्यांना सहलीचा लाभ दिला जात आहे. याबाबत हुक्केरी, चिकोडी तालुक्यांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
साहेब आम्हाला जनावरांचे दूध काढायचे आहे. तेव्हा आम्हाला घरी सोडा, असे म्हणून काही सोसायटीचे संचालक संबंधित नेत्याकडे विनवणी करत असल्याची चर्चा आहे. मात्र त्या नेत्याने संचालकांना त्याच ठिकाणी कपडे व अन्य सुविधा पुरविल्याने याची जोरात चर्चा सुरू आहे.
खानापूर तालुक्यातील मध्यवर्ती बँकेचे मतदार कोल्हापूर येथील एका फार्म हाऊसवर ठेवण्यात आल्याची जोरदार चर्चा खानापूर व बेळगाव तालुक्यात सुरू झाली आहे. खानापूर तालुक्यात या निवडणुकीची मोर्चे बांधणी दोन महिन्यापूर्वी सुरू झाली होती. त्यानंतर काही जणांनी माघार घेतल्यामुळे चुरस कमी झाली असली तरी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे.