

बेळगाव : आमच्या भागाचा विकास व्हायचा असेल, तर बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्हा निर्माण करण्यात यावा. नव्या जिल्ह्यासाठी अधिक अनुदान देऊन विकासाला चालना द्यावी, अशी मागणी चिकोडी-सदलगा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी यांनी केली. विधिमंडळ अधिवेशनात शुक्रवारी (दि. 12) विधानसभेत उत्तर कर्नाटकावर चर्चा करण्यात आली. त्यावेळी आमदार हुक्केरी यांनी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून चिकोडी जिल्हा निर्माण करण्याची मागणी लावून धरली.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून विकासासाठी चिकोडीसह दोन किंवा तीन जिल्हे निर्माण करावेत. फक्त जिल्हे जाहीर करून न थांबता विकासासाठी पुरेसे अनुदान द्यावे. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदार आणि खासदारांची बैठक घेऊन चिकोडी जिल्ह्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री शिवकुमार यांनी महालक्ष्मी उपसा सिंचन प्रकल्पासाठी 450 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. त्या प्रकल्पाचा पहिला टप्पा अपूर्ण आहे. 27 किलोमीटरची सिंचन पाईपलाईन आहे. प्रकल्पाचा दुसरा टप्पा पार पाडण्यासाठी अनुदान मंजूर करावे.
आमदार हुक्केरी म्हणाले, चिकोडी जिल्ह्याची निर्मिती, महालक्ष्मी उपसा सिंचन प्रकल्प, जैन विकास महामंडळ, सीमेवर औद्योगिक वसाहत उभारणी, चिकोडी न्यायालयाचे उद्घाटन आणि शिवशक्ती प्रकल्पाला मंजुरी याकडे सरकारचे लक्ष वेधले. रायबाग आणि चिकोडी तालुक्यातील गावांसाठी 220 कोटी रुपयांच्या अनुदानासह शिवशक्ती प्रकल्पाला थेट मंजुरी देण्यात आली आहे. डीपीआर बनवून मंत्रिमंडळात मंजुरी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जैन समाजाच्या मागणीनुसार कर्नाटकात जैन महामंडळ स्थापन करावे. यामुळे जैन समाजातील गरीब विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि समुदायाच्या विकासात मदत होईल. सीमावर्ती भागातील तरुण रोजगारासाठी शेजारील महाराष्ट्र राज्यातील पुणे, कोल्हापूर आणि सांगली शहरांमध्ये जातात. त्यामुळे उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांनी सीमेवर औद्योगिक क्षेत्रे स्थापन करून रोजगार निर्माण करावा, अशी मागणी हुक्केरी यांनी केली.
डॉ. प्रभाकर कोरे यांचे मोठे योगदान
केएलई संस्थेने जिल्ह्यात शिक्षणात मोठे नाव कमावले आहे. यामध्ये कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्यामुळे शिक्षण मिळाले आहे, आता रोजगारासाठी सरकारने उद्योग सुरू करावेत, असे आवाहन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले.