

Manjunath Rao death in Pahalgam terror attack
बंगळूर : जम्मूतील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शिमोग्यातील मंजुनाथ राव यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी पल्लवी आणि मुलगा अभिजित यांच्यासमोर त्यांच्या डोक्यात गोळी मारण्यात आली. पल्लवी यांनी आपल्यासह मुलालाही गोळ्या मारण्याची विनंती दहशतवाद्याला केली. त्यावेळी त्याने ‘नही मारेंगे, मोदी को बोल दो’ असे उत्तर दिले.
मुलाने सकाळपासून काही खाल्ले नव्हते. त्यामुळे, नाश्ता मिळतो का ते पाहण्यासाठी मंजुनाथ एका दुकानदाराशी बोलत होते. त्याचवेळी तीन ते चार दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार सुरु केला. गोळीबाराचा सराव सुरु असल्याचा आमचा समज झाला. पण, दुकानाजवळ गेल्यानंतर मंजुनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी मारली. ते जागीच ठार झाले होते. इतर पर्यटक ‘भागो भागो’ म्हणत पळत सुटले. केवळ पुरुषांनाच मारण्यात आल्याचे दिसून आले. प्रत्येकाचे नाव विचारुन त्यांच्या डोक्यात गोळ्या मारल्या. त्यानंतर दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाल्याचे पल्लवी यांनी सांगितले.
त्यांनी मदतीसाठी स्थानिकांना आवाहन केले. स्थानिक गाईडने पल्लवी यांच्यासह सर्व पीडितांना धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तीन स्थानिक युवक तेथे आले. त्यांनी ‘बिसमिल्लाह बिसमिल्लाह’ म्हणत आपल्यासह अनेक पर्यटकांची मदत केल्याची माहिती पल्लवी यांनी दिली.
मंजुनाथ यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार मुलगा अभिजितने बारावीत 97 टक्के गुण घेतल्याने जम्मूला जाण्याचे ठरवले. कुटुंबियांची कर्नाटकाबाहेरची ही पहिलीच सहल होती. आईने काश्मीरऐवजी इतर ठिकाणी जाण्यास सांगितले होते. पण, मंजुनाथ यांनी स्थानिक ट्रॅव्हेल कंपनीत तिकीट आरक्षित करुन अन्य काहीजणांसोबत काश्मीरला जाण्याचे निश्चित केले. 19 एप्रिलला ते काश्मिरला पोचले. 24 रोजी ते शिमोग्याला परतणार होते. पण, 22 रोजी दहशतवादी हल्ल्यात ते ठार झाले.