

निपाणी : निपाणी विधानसभा मतदारसंघात शासनाच्या विविध योजना घरोघरी पोहोचविण्याचे प्रामाणिक काम केले आहे. शासकीय लाभापासून कुणीही वंचित, उपेक्षित राहणार नसल्याची दक्षता आपण घेतली असल्याचे प्रतिपादन आमदार शशिकला जोल्ले यांनी केले. नगरपालिकेच्यावतीने आयोजित विविध शासकीय योजनांतर्गत लाभार्थ्यांना लॅपटॉप, शिलाई मशीन, तिचाकी वितरण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
आयुक्त गणपती पाटील यांनी स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर लाभार्थ्यांना लॅपटॉप, घरगुती उद्योगासाठी महिलांना शिलाई मशीन, दिव्यांग लाभार्थ्यांना तिचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले. आमदार जोल्ले म्हणाल्या, एसएफसी आणि एसबीएममधून विविध कामे पूर्णत्वास आली आहेत. जवळपास 32 पैकी 11 जणांना लॅपटॉप, 29 जणींना शिलाई मशीन तर 8 लाभार्थ्यांना तीनचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी चार टिप्पर व दोन ट्रॅक्टरचे लोकार्पण झाले आहे. येत्या काळात आणखी चार टिप्पर दाखल होतील. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीतून साकारलेल्या सोलार योजनेंतर्गत लाभार्थ्यांना सोलार कीट दिले जातील.
बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे म्हणाले, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील जनतेला पंचहमी दिल्याने आर्थिक पाठबळ मिळाले आहे. शासनाच्या विविध योजना आमदार शशिकला जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघात घरोघरी पोहोचवल्या आहेत. राज्यात काँग्रेस व भाजप सरकारने विकासाभिमुख काम केले आहे. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष जयवंत भाटले, माजी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, सुनील पाटील, माजी नगरसेवक राजू गुंदेशा, नीता बागडे, आशा टवळे, अरुणा मुदकुडे, सुजाता कदम, प्रभावती सूर्यवंशी, कावेरी मिरजे, दीपक सावंत, संजय चव्हाण यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते. संपत कुरणे यांनी सूत्रसंचालन केले. एस. बी. माने यांनी आभार मानले.