

बेळगाव : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा निकाल अखेर रविवारी (दि. 2) जाहीर करण्यात आला. त्यामध्ये निपाणी येथून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, हुक्केरीतून माजी खासदार रमेश कत्ती, बैलहोंगलमधून माजी आमदार महांतेश दोडगौडर आणि कित्तूर येथून नानासाहेब पाटील विजयी झाले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी 19 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. पण, चार मतदारसंघांतील तेरा पीकेपीएस संस्था न्यायालयात गेल्यामुळे चारही मतदारसंघांची मतमोजणी राखून ठेवण्यात आली होती. न्यायालयाने संस्थांची याचिका निकालात काढल्यामुळे आज जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इमारतीत मतमोजणी करण्यात आली. निवडणूक अधिकारी श्रवण नाईक यांनी निकाल जाहीर केले.
निपाणी मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांनी 71 मते, हुक्केरीमधून रमेश कत्ती यांनी 59 मते, बैलहोंगल मतदारसंघातून महांतेश दोड्डगौडर यांनी 54 मते आणि कित्तूर मतदारसंघातून नानासाहेब पाटील यांनी 17 मते मिळवून विजय मिळवला.
बँकेवर जारकिहोळी-जोल्ले गटाने वर्चस्व राखले आहे. आता 10 नोव्हेंबर रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता जारकिहोळी यांच्याकडून कोणाला संधी मिळणार हे पाहावे लागणार आहे.
अध्यक्षपदासाठी सर्वजण इच्छुक : जोल्ले
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर नूतन संचालक व माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निकाल जाहीर झाले. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लवकरच होणार आहे. माझ्यासह सर्वजण अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. आम्ही सर्वजण जारकीहोळी गटात आहोत. आम्ही आमदार भालचंद्र जारकीहोळी आणि पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याशी चर्चा करून अध्यक्ष निवडू, असे सांगितले.