

बेळगाव : शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सौंदत्ती डोंगरावरील रेणुकादेवीची यात्रा उत्साहात पार पडली. या यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडूसह विविध ठिकाण होऊन लाखोंच्या संख्येने भाविक डोंगरावर दाखल झाले होते. शनिवार दि. 3 रोजी रेणुका देवी मंदिरामध्ये सकाळी आरती झाली. त्यानंतर परड्या भरण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उदे गं आई उदे... असा जयघोष करत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेचा शनिवार मुख्य दिवस होता. हा सोहळा उत्साहात पार पडला. लाखो भाविकांनी रेणुका मातेच्या दर्शनासाठी हजेरी लावली. मात्र, अनेकांना दर्शन मिळाले नाही. गुरुवार दि.1 पासून या यात्रेला प्रारंभ झाला असून, शनिवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. सध्या कडाक्याची थंडी असूनही त्याची तमा न बाळगता भाविकांनी मध्यरात्रीपासूनच जोगणभावीमध्ये स्नानासाठी गर्दी केली होती. थंडीत ही स्नान करून भाविक डोंगरावर जात होते.
रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविक रांगेत दाखल होत होते. मात्र भाविकांच्या गर्दीमुळे तब्बल 10 ते 12 तास दर्शनासाठी लागत होते. वृद्ध तसेच महिलांना रांगेत उभे राहणे अवघड झाले होते. काहींनी बाहेरूनच दर्शन घेतले तर काही भक्त मात्र रांगेत उभे राहून दर्शन घेताना दिसत होते. पौर्णिमेला परंपरेनुसार बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांतील भाविकांनी एकत्र येऊन सामूहिक परडी भरण्याचा विधी दरवर्षीप्रमाणे श्रद्धेने केला. मंदिर परिसरात असलेल्या खुल्या जागेमध्ये भाविकांनी मंडप घालून त्या ठिकाणी प्रसाद केला. भाविक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात येत असल्यामुळे वारंवार रहदारीचा कोंडीचा सामना करावा लागला.