

बेळगाव : कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा तसेच आंध्रप्रदेश परिसरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानात सोमवार दि. 22 पासून नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ झाला. मंदिरावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने परिसर उजळून गेला आहे. सोमवारी विविध अलंकारांनी देवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती.
सोमवारी देवस्थान विकास प्राधिकरणचे सचिव अशोक दुडगुंटी यांच्या प्रमुख उपस्थितीत यल्लम्मा मंदिरात घटस्थापनेबाबतच्या विधी झाल्या. नवरात्रोत्सवाच्या दुसर्या दिवशी मंगळवारपासून भक्तांची दर्शनासाठी गर्दी होणार आहे. देवस्थान प्राधिकरणतर्फे नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आगामी आठ दिवस भक्तांना मूलभूत सुविधा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या उत्सव काळात लाखो भाविक दाखल होणार असून विविध साहित्याचे दुकानेही थाटण्यात आली आहेत. 1 ऑगस्ट रोजी आयुध पूजेचे नियोजन असून दि. 2 रोजी सीमोल्लंघनाने या उत्सवाची सांगता होणार. उत्सवादरम्यान कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी देवस्थान विकास प्राधिकरणाने नियोजन केले आहे. आरोग्य खात्यातर्फे पथकही कार्यरत आहे. दिव्यांगांना दर्शनासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.