

सुखापुरी (ता. अंबड) : अंबड तालुक्यातील रुई येथील श्रीराम तांड्यावर घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हळहळून गेला आहे. रस्ता व पुलाच्या सुविधाअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने तांड्यावरील तीन वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या बालकाचे नाव प्रथमेश प्रेमदास पवार असे असून, याबाबत त्याचे वडील प्रेमदास कबीरदास पवार तसेच आजोबा कबीरदास किसन पवार व आजी शोभा कबीरदास पवार यांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
रुई गावापासून दोन किलोमीटर अंतरावर भद्रायणी नदीच्या पूर्व बाजूस श्रीराम तांडा वसलेला आहे. येथे बंजारा समाजाचे कुटुंब राहत असून तांड्यावर रस्ता व पुलांची सुविधा नसल्याने नागरिकांना कायमच हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या संततधार व अतिवृष्टीमुळे परिसरातील नदी, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सिद्धेश्वर–पिंपळगाव तलाव ओव्हरफ्लो झाल्याने भद्रायणी नदीला मोठा पूर आला आहे.
याच दरम्यान, प्रथमेश अचानक आजारी पडला. उपचारासाठी त्याला गावातील दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र नदीला आलेल्या महापुरामुळे गावाशी संपर्क तुटल्याने वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही. अखेर उपचाराअभावी या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
स्थानिकांचा संताप
“गेल्या अनेक वर्षांपासून तांड्यावर रस्ता व पुलांची कोणतीही सुविधा नाही. प्रशासनाने वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने एका निष्पाप जीवाचा बळी गेला आहे. हा प्रकार म्हणजे प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण आहे,” अशी भावना मृत बालकाचे कुटुंबीय व तांड्यातील नागरिकांनी व्यक्त केली.
परिसरातून हळहळ व्यक्त
एका निष्पाप बालकाच्या मृत्यूमुळे संपूर्ण रुई परिसरात शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तांड्याच्या विकासाविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तातडीने रस्ता व पुलाची सुविधा उपलब्ध करून देऊन अशा घटना टाळाव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिकांनी केली आहे. गेल्या दोन तीन दशकांपासून तांड्यावर नागरिकांनाची रस्ता व पुलासाठी आजी ,माजी लोकप्रतिनिधी कडे मागणी करूनही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष केले असा आरोप नागरिकांनी केला आहे