

संकेश्वर : प्रियकराने लग्नास नकार देऊन दुसऱ्या मुलीशी विवाह केल्याने प्रेयसीने विषप्राशन करून जीवन संपवल्याची घटना हुक्केरी तालुक्यातील एका गावात घडली. रक्षिता (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
कमतनूर येथील सुरेश पाटील याने रक्षिताला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते. त्यानंतर आपण उच्च जातीचा असल्याचे सांगत लग्न करण्यास तिला नकार दिला. शिवाय सुरेशने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्याने मानसिक त्रासातून रक्षिताने बुधवारी रात्री 11.30 च्या सुमारास राहत्या घरात विष प्राशन केले. कुटुंबीयांना मुलीने विषप्राशन केल्याचे समजताच तिला संकेश्वर सरकारी रुग्णालयात दाखल केले.
पण, उपचार सुरु असताना तिचे निधन झाले. रक्षिताची आईने संकेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून आपल्या मुलीच्या मृत्यूस सुरेश पाटीलच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. उपनिरीक्षक विठ्ठल नाईक पुढील तपास करत आहेत.