

बेळगाव : उसने घेतलेले दहा हजार रुपये दीड वर्षापासून देत नसल्याच्या रागातून ऑटोरिक्षाचालकाने महिलेच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केला. मंगळवारी (दि. 5) रात्री अकराच्या सुमारास सदाशिवनगरमधील लक्ष्मी कॉम्प्लेक्ससमोरील इंडियन ऑईल पेट्रोल पंपाच्या बाजूला ही घटना घडली.
महादेवी बागप्पा करेण्णावर (वय 42, मूळ रा. मच्छे, सध्या रा. सदाशिवनगर, दुसरा क्रॉस) असे मृत महिलेचे नाव आहे. घटनेनंतर अवघ्या पाच तासांत पोलिसांनी संशयिताला अटक केली. संतोष थावरू जाधव (38, मूळ रा. सोमापूर तांडा, बिळगी, जि. विजापूर, सध्या रा. श्रीनगर) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, महादेवी करेण्णावर या मूळच्या मच्छेतील आहेत. पतीशी भांडण झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून त्या आपल्या तरुण मुलासह सदाशिवनगरमध्ये राहतात. त्या एका मेसमध्ये कामाला असून मंगळवारी रात्री काम संपवून अकराच्या सुमारास घरी निघाल्या होत्या. त्यांचा संतोषशी आधीपासून परिचय होता. त्याच्याकडून 10 हजारांची रक्कम घेतली होती. संतोषने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सदर महिलेने त्याच्याकडून दीड वर्षापूर्वी दहा हजार रुपये घेतले होते. ही रक्कम देण्यास त्या सातत्याने टाळाटाळ करीत होत्या. यातून त्यांच्यात अनेकदा वाद झाला होता.
पंपाजवळही यातूनच दोघांमध्ये वाद झाला. यानंतर संतोषने ऑटोरिक्षात ठेवलेला लोखंडी रॉड काढत सदर महिलेच्या डोकीत वार केले. घाव वर्मी लागल्याने त्या तेथेच पडल्या व संतोष पळून गेला. रस्त्यापासून काही अंतरावर निपचित पडलेल्या महिलेला पाहून ही माहिती काहींनी पोलिसांना कळवली. एपीएमसीचे निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकार्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिस आयुक्त भूषण बोरसे, कायदा व सुव्यवस्था शाखेचे डीसीपी एन. व्ही. बरमनी, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली तेव्हा सदर महिलेचा मुलगा त्याच्या आजोळी हुक्केरीला गेला होता. त्याला बोलावून घेत पोलिसांनी सर्व माहिती दिली. सदर महिलेचा पतीही पैशासाठी महिलेशी भांडण काढत होता. त्याला कंटाळून त्या मुलासह स्वतंत्र राहत होत्या. त्यामुळे, पोलिसांची संशयाची सुई आधी सदर महिलेच्या पतीवर गेली. त्यांनी रात्रीच तपास करत पाळेपुळे खणण्यास सुरवात केली. परंतु, पती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या महिलेशी कर्जाच्या रकमेसाठी भांडण काढणार्या ऑटोरिक्षाचालकाचे नाव समोर आले. त्याला आणून चौकशी केली असता तो संतोष असल्याचे स्पष्ट झाले. त्याला ताब्यात घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली. अवघ्या पाच तासांत संशयित गजाआड केल्याने पोलिस आयुक्त बोरसे यांनी टीमचे कौतुक केले.