

बेळगाव : घरात असलेली रिव्हॉल्व्हर मुलाने घेऊन खटका दाबल्याने गोळी उडून मुलगा जखमी झाल्याची खळबळजनक घटना सांबरा (ता. बेळगाव) येथे शुक्रवारी (दि. 14) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या त्या मुलाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्याददार बसवाणी आडव्याप्पा नावलकट्टी यांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हर घेतली आहे. त्यांच्या मुलाने घरात ठेवलेली रिव्हॉल्व्हर घेतली. त्याच्याकडे कोणाचे लक्ष नव्हते. त्याने अचानक रिव्हॉल्व्हरचा खटका दाबल्याने जोरदार आवाज झाला. त्यामुळे घरातील मंडळी तातडीने त्याच्याकडे धावली. त्यांनी त्या मुलाकडील रिव्हॉल्व्हर काढून घेतली. या घटनेत त्या मुलाच्या गालाला व कानाला गोळी घासून गेली. सुदैवानेच तो बचावला आहे. मात्र, या घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला. तातडीने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मारिहाळ पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी रविवार, दि. 16 रोजी महादेवनगर, सांबरा येथे जाऊन चौकशी केली. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर जप्त केली. याप्रकरणी त्या मुलाच्या आई, वडिलांवर निष्काळजीपणा दाखवला म्हणून शस्त्र कायदा 1959 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.
रिव्हॉल्व्हर हातात घेतल्यानंतर त्या मुलाचा हात खटक्यावर पडला. काही समजण्यापूर्वीच त्यामधून गोळी बाहेर पडली. ती गोळी त्याच्या गालाला व कानाला घासून गेली. यावेळी त्या ठिकाणी कोणी नव्हते. त्यामुुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची सांबरा परिसरात चर्चा सुरू आहे.