

बेळगाव : राज्योत्सव मिरवणुकीच्या नावाखाली कन्नड संघटनांनी शहरात धुडगूस घातला असला, तरी ही मिरवणूक चोरट्यांच्या पथ्यावर पडली आहे. चोरट्यांनी तब्बल 300 हून अधिक मोबाईल आणि काही जणांची पाकिटे लांबविली आहेत. याबाबत तक्रार करण्यासाठी रविवारी (दि. 2) दिवसभर खडेबाजार पोलिस ठाण्यात गर्दी उसळली होती. अनेकांचे मोबाईल व पाकिट मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीत चोरीला गेल्याने अनेकांनी त्या पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.
बेळगावातील मराठी भाषिकांना डिवचण्यासाठी राज्योत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचे प्रमाण वाढले आहे. परतालुका व जिल्ह्यातून भाडोत्री कार्यकर्ते आणले जातात. यंदा शनिवारी (दि. 1) झालेल्या मिरवणुकीसाठी बाहेरुन कार्यकर्ते आणण्यात आले होते. मिरवणुकीच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवून डीजेच्या तालावर अतिउत्साही कन्नड कार्यकर्ते बेफाम होऊन धिंगाणा घालत होते. मात्र, त्यातील अनेकांना चोरट्यांनी इंगा दाखविला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी अनेकांचे मोबाईल लांबविले व पाकिटेही मारली. शनिवारी दिवसभर चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता. या प्रकारामुळे अनेकांना मोठा फटका बसला तर पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली.
हुल्लडबाजीच्या नादात मोबाईल व पाकिट लांबविल्याचे अनेकांच्या लक्षात आले नव्हते. मिरवणूक संपल्यानंतर रात्री उशीरा अनेकांना त्याची जाणीव झाली. शनिवारी तक्रार देण्यासाठी गेलेल्यांना ओळखपत्र घेऊन या, असे सांगून पोलिसांनी माघारी धाडले होते. त्यामुळे, रविवारी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्ये मोठी गर्दी जमली होती. इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारची चोरी ही केवळ राज्योत्सव मिरवणुकीतच होत आहे. याची सध्या शहर आणि जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. आता या चोरट्यांना पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.