बेळगाव ः पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी सौंदत्ती येथील नराधमाला 20 वर्षांचा कारावास आणि दहा हजार रुपयांची शिक्षा जिल्हा पोक्सो न्यायालयाने मंगळवारी (दि. 1) सुनावली. हणमंत पुंडलिक चिप्पलकट्टी (वय 21) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. फिर्यादी आपल्या पत्नी, दोन मुली आणि एका मुलासह राहत होता. आरोपी हणमंत याने 7 नोव्हेंबर 2011 रोजी फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून गोनगनूर येथील टेकडीवर नेऊन वारंवार बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारू, अशी धमकी दिली, असे दोषारोप सौंदत्ती पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी एम. आय. नडुविनमनी यांनी पोक्सो न्यायालयात दाखल केले.
न्यायाधीश सी. एम. पुष्पलता यांनी या प्रकरणात 20 साक्षी तपासल्या. मुद्देमाल आणि दाखल्यांच्या आधारे दोषी हणमंत याला 20 वर्षांची कठोर शिक्षा आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या घटनेतील पीडित मुलीला जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाने 1 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही त्यांनी दिले. फिर्यादीच्या बाजूने विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.