‘पुढारी’ हा सर्वसामान्य जनतेचा आवाज : सहकाररत्न उत्तम पाटील
निपाणी : दै. ‘पुढारी’ केवळ वृत्तपत्र नाही तर जनतेचा आवाज असून ‘पुढारी’चे समाजप्रबोधन व लोकशाही मूल्यांच्या जपणुकीतील योगदान अधोरेखित झाले असल्याचे मत युवा नेते सहकारत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त केले. दै. ‘पुढारी’च्या वर्धापन दिनानिमित्त सदिच्छा भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी ‘पुढारी’च्या सामाजिक बांधिलकीच्या पत्रकारितेचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
पाटील म्हणाले, ‘पुढारी’ हे केवळ वृत्तपत्र नसून जनतेचा आवाज आहे. सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘पुढारी’ सातत्याने करत आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला तसेच युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका या वृत्तपत्राने कायम जपली आहे. निर्भीड, सत्याधिष्ठित आणि लोकाभिमुख पत्रकारिता हीच ‘पुढारी’ची ओळख आहे. बदलत्या काळात माध्यमांपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीतही ‘पुढारी’ने आपल्या मूल्यांशी तडजोड न करता विश्वासार्हता जपली आहे. समाजप्रबोधन, लोकशिक्षण आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यामध्ये ‘पुढारी’चे योगदान उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
‘पुढारी’ कार्यालयातील प्रतिनिधींनी उत्तम पाटील यांचे स्वागत करून त्यांच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले. वाचकांचा विश्वास आणि मान्यवरांचा पाठिंबा हीच ‘पुढारी’ची खरी ताकद असून भविष्यातही अधिक जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक दिलीप पठाडे, शौकत मणेर, शेरू बडेघर, दत्तात्रय नाईक उपस्थित होते.

