

बंगळूर : जेव्हा श्रोते बदलतात, तेव्हा भाषणात बदल होतो, अशी टीका गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर केली. शनिवार, दि. २९ रोजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित 'एक जग एक मानवता' या बहुधार्मिक कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी हिंदुत्वाच्या संकल्पनेला मुस्लिमांशिवाय भारत नसल्याचे म्हटले आहे.
भागवत यांच्या या वक्तव्यावर गृहमंत्री खर्गे यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर एक निवेदन पोस्ट करत भारतातील व परदेशातील आरएसएसच्या भूमिकेवर टीका केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या शतकापासून भारतात 'हिंदू राष्ट्रा'च्या संकल्पनेचा पुरस्कार करत आहे; मात्र अमेरिकेत तो धार्मिक सलोखा, वैश्विक मानवी ऐक्य व सर्वसमावेशक समाजाबद्दल बोलत आहे. भारतात मांडलेली भूमिका व परदेशात दिला जाणारा संदेश यातील हा फरक लक्षात घेणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.
तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोहन भागवत यांच्या तीन देशीय दौऱ्याचा व त्यांच्या 'विश्व ऐक्य' संदेशाचा वापर विदेशात स्थायिक भारतीयांकडून निधी उभारण्यासाठी करत आहे का, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. परदेशातील भारतीय समुदायाला संघटित करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परदेशी नेटवर्कच्या भूमिकेची तपासणी करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.