

बेळगाव : सरकार व प्रशासनाकडून सीमावासियांवर कन्नडसक्ती, भाषिक अत्याचार व विविध खोटे गुन्हे यावर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकावर दबाव आणावा, अशी विनंती म. ए. युवा समिती सीमाभागतर्फे बुधवारी (दि. 10) सीमाप्रश्नी तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांच्याकडे केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. काही कन्नड संघटनांच्या दबावाला बळी पडत प्रशासन मराठी भाषिकांवर कारवाई करत आहे. सीमालढ्यात सक्रिय असणार्या कार्यकर्त्यांना वेठीस धरले जात आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत महाराष्ट्र गीत लावल्याचा ठपका ठेवत दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेत मराठीची मागणी केली म्हणून समितीच्या नगरसेवकांचे सभासदत्व रद्द करण्याचा हालचाली सुरु आहेत. शिवभक्त युवकांना गुन्ह्यांत अडकवले जात आहे.
अन्यायाच्या विरोधात आवाज उठविल्याने शुभम शेळके यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली. महाराष्ट्र व कर्नाटक सरकारचे तीन तीन समन्वक मंत्र्यांची समितीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे येथील भाषिक अत्याचार दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत. याविरोधात कर्नाटक सरकारवर दबाव आणा अशा मागणीचे निवेदन खासदार माने यांना देण्यात आली.
शुभम शेळके, अशोक घगवे, राजू पाटील, सूरज जाधव, साईराज कुगजी, दिगंबर खांबले आदींनी वस्तुस्थिती कथन केली. यावेळी तज्ज्ञ समितीचे सहअध्यक्ष खासदार धनंजय महाडिक, मंत्री चंद्रकांत पाटील, अॅडव्होेकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव, माजी सनदी अधिकारी दिनेश ओऊळकर, अॅड. महेश बिर्जे, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, जयराम मिरजकर, रामचंद्र मोदगेकर, आनंद आपटेकर यांच्यासह महाराष्ट्र शासनाचे अधिकारी उपस्थित होते.