

निपाणी : निपाणी नगरपालिकेवर भगवा ध्वज फडकवण्यास पोलिस प्रशासनाने विरोध केला आहे. त्याबाबत आपणास तहसीलदार कार्यालयाने नोटीस बजावली असल्याची माहिती नवनाथ चव्हाण यांनी पत्रकारांना दिली.
ते म्हणाले, भगवा ध्वज हा हिंदुत्वाचे, शौर्याचे प्रतीक आहे. हा ध्वज पालिकेवर पूर्वीपासून फडकत होता. तो जीर्ण झाल्यानंतर बदलण्यात आला नाही. आपण स्वराज्य संघटनेच्यावतीने हा ध्वज बदलण्याचा निर्णय घेतला होता. परंतु पोलिसांनी नगरपालिकेवर जाण्यासाठी असलेल्या दरवाजाला कुलूप लावले आहे. पालिकेसमोर रस्त्यावर ध्वज लावण्यासाठी ध्वजस्तंभ उभारण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही पोलिसांनी अटकाव केला आहे. तसेच ध्वज फडकवण्यासाठी प्रयत्न केल्यास अटक करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे भगवा ध्वज फडकवण्याचा कार्यक्रम स्थगित केला आहे.
अजित पाटील म्हणाले, पालिकेवर भगवा ध्वज लावण्यास विरोध का, लोकप्रतिनिधींना हे मान्य आहे का, भगवा ध्वज हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. तो हिंदुत्वाचा आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे राजकीय पक्ष नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी हा ध्वज लावण्यासाठी पुढाकार घ्यावा.
दरम्यान, सोमवारी सायंकाळी पोलिस उपनिरीक्षक कारजोळ व पोलिसांनी पालिकेत येऊन पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत भगवा ध्वज लावू द्यायचा नाही, असा चंग पोलिसांनी बांधला आहे.