

निपाणी : निपाणी तालुक्याचे कामगार निरीक्षक नागेश यल्लाप्पा कळसन्नावर यांच्यावर लोकायुक्त विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. बोरगाव येथील पानमसाला कारखानदाराकडून कागदपत्राच्या पूर्ततेसाठी १० हजार रुपयांची लाच घेताना ते पथकाला रंगेहाथ आढळून आले. त्यानुसार पथकाने कळसान्नावर यांच्यावर कारवाई करून त्यांची हिंडलगा जेलमध्ये रवानगी केली. या कारवाईमुळे शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, राजू पाच्छापुरे यांचा बोरगाव येथे पान मसाला कारखाना आहे. दरम्यान त्यांनी कागदपत्राच्या पूर्ततेसाठी कामगार निरीक्षक कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार त्या कागदपत्राची पूर्तता करून देण्यासाठी निरीक्षक कळसन्नावर यांनी पाच्छापुरे यांच्याकडून १० हजार रुपयाची मागणी केली होती.
त्यानुसार पाच्छापुरे हे सोमवारी सायंकाळी कामगार निरीक्षक कार्यालयात कळसन्नावर यांनी मागीतलेली रक्कम सुपूर्द करण्यासाठी आले होते. दरम्यान याचवेळी लोकायुक्त विभागाचे उपाधीक्षक (डीएसपी) भरत रेड्डी, सीपीआय व्यंकटेश यडहळी, उपनिरीक्षक संगमेश होसमनी, कर्मचारी बसु हुद्दार, बसवराज कुडोळी, बसु येडहळी, अभिजीत जमखंडी, शशी देवरमनी यांनी सापळा रचुन कळसन्नावर यांना रंगेहाथ पकडले.
दरम्यान कामगार निरीक्षक यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्याचे कळताच माने प्लाॅट येथील कार्यालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.या कारवामुळे शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.